सागर कुटे, अकोला : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मंगळवारी हजेरी लावली. त्यामुळे उन्हाळी ज्वारी, आंबा, केळी, लिंबू व फळबागांना फटका बसला. वादळाचा जोर अधिक असल्याने घरांवरील टिनपत्रे उडाली.
यंदाच्या उन्हाळ्यामध्ये वारंवार वातावरणातील बदलांचा फटका शेतकरी व सर्वसामान्यांना बसत आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या जवळ गेला आहे. त्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे उकाडा कायम आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यातील बार्शीटाकळी, बाळापूर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काढणीस आलेल्या उन्हाळी ज्वारीचे मोठे नुकसान झाले. त्यात वादळी वारा असल्यामुळे काही ठिकाणी झाले उन्मळून पडली होती. या पावसामुळे वाढत्या उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळाला.