अकोला: जिल्ह्यात रविवारी रात्री गारपीट व अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. प्रामुख्याने रब्बी ज्वारी, मका, गहू, हरभरा, सूर्यफूल या पिकांसह फळबागांना सर्वाधिक फटका बसला. बहुतांश गावांमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेकांना रात्र अंधारात काढावी लागली. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटले. त्यामुळे शेतकर्यांनी रब्बी हंगामासाठी कंबर कसली; मात्र अकोला, मूर्तिजापूर, बाश्रीटाकाळी, पातूर तालुक्यांमध्ये शनिवारी रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रब्बी गहू, ज्वारी, हरभरा व फळबागांचे नुकसान झाले. काही गावांमध्ये गव्हाचे पीक जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी उत्पादनावर परिणाम होणार नसला तरी दाण्याच्या दर्जावर पावसाचा परिणाम होणार असल्याचे कृषितज्ज्ञांचे मत आहे. दोनद व कानशिवणी परिसरात पाऊस झाला. यामुळे पिकाला कमी बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने तातडीने पावले उचलून नुकसानभरपाईचा निर्णय घ्यावा व शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. बाश्रीटाकळी तालुक्यात गारपीट; २५0 हेक्टरवरील पिकांचे नुकसानबाश्रीटाकळी तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसाचा २५0 हेक्टरवरील पिकांना फटका बसला. वादळी वार्यासह पाऊस झाला तसेच लिंबाएवढय़ा गारा पडल्या. त्यामुळे महागाव, मांगूळ, मिर्झापूर, दगडपारवा, रेडवा, काजळेश्वर, पुनोती बु., पुनोती खु. परिसरातील पिकांची नासाडी झाली. काही घरांवरील टिनपत्रे उडाली. रब्बी गहू, हरभरा, कांदा ही पिके जमीनदोस्त झाली. २0 मिनिटांपर्यंत गारांचा वर्षाव झाला. जवळपास दीड तास जोरदार पाऊस झाला. महागावात घरावरील कौले फुटली. रेडवा गावातही गारा पडल्या. अनेक गावांमध्ये पाने गळून झाडे निष्पर्ण झाली. नुकसानाचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे तहसील कार्यालयाने कळविले आहे.
अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट
By admin | Published: March 01, 2016 1:34 AM