अकोला: वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्हयात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बांधावर पोहोचत गुरुवारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी नुकसाग्रस्त भागातील पीक नुकसानीची पाहणी केली. पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना दिले.
अकोला तालुक्यातील दहिगाव, रामगाव, म्हैसांग या तीन गावांच्या परिसरात भेट देऊन शेतातील पीक नुकसानीची पाहणी केली. पिकांचे नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करुन तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेवून व परिपूर्ण नोंदी घेवून नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, कृषी उपसंचालक विलास वाशीमकर, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरूणकर यांच्यासह शेतकरी गोपाल दोड, बाळकृष्ण गावंडे, मुकुंद गावंडे, देवराव गावंडे, विनोद टेके, देवराव बापूंना टेके, शंकर सुलताने आदी शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांशी साधला संवाद; एेकूण घेतल्या व्यथा !पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा एेकून घेतल्या. अवकाळी पावसाच्या तडाख्यात वेचणीला आलेला कापूस भिजला असून, तूर व हरभरा पिकाचेही नुकसान झाल्याचे या भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी सांगीतले.
१४ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान !अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्हयात प्राथमिक अंदाजानुसार १४ हजार १४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यात ३२ हेक्टर, अकोला तालुक्यात ७ हजार ९५१ हेक्टर, पातूर तालुक्यात २ हजार ४८२ हेक्टर, बार्शिटाकळी तालुक्यात ३ हजार ५४९ हेक्टर पीक नुकसानीचा समावेश असून, जिल्हयातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने देण्यात आली.