अकोला: जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, मंगळवार, दि.९ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास शहरामध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. आगामी दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना धोका निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात मागील दिवसांपासून थंडी गायब झाल्याचे चित्र आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पारा १४ अंशावर गेला होता, परंतू आता ढगाळ वातावरणाने किमान पारा १६ ते १७ अंशावर आहे. ढगाळ वातावरण असल्याने अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तविण्यात येत असून, मंगळवारी दुपारच्या सुमारास अकोला शहरात अवकाळीच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात अचानक बदल होऊन हवेत गारवा निर्माण झाला होता. पहाटे धुके, रात्री थंडीचा कडाकाजिल्ह्यात गत तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत असून, पहाटेच्या सुमरास दाट धुकेही पडत आहे. याचा फटका रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. कारण, दीड महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा खरीप हंगामातील कपाशी, तूर पिकासह रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिकाला मोठा फटका बसला. तशीच स्थिती आता निर्माण झालेली आहे. तर ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांवरही धुके आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम होऊ शकतो. यामुळे उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. तुर काढणीसाठी शेतकऱ्यांची धांदलघाईजिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील तुरीच्या पिकाची सोंगणीला वेग आला आहे. गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे सोंगणी केलेल्या तुरीची काढणीसाठी शेतकऱ्यांची धांदलघाई सुरू आहे. त्यात कापूस वेचणीही सुरू असल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी ज्यादा मजुरी देऊन तुरीची काढणी करीत असल्याने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे.