अकोला : जिल्ह्यात गत दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे सोंगणी केलेल्या तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गव्हाचे पिकावर रोगराई पसरल्याने शेतकरी संकटात सापडले आहे.
वरुर जऊळका : परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गत दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे वरूर जऊळका परिसरातील लोतखेड, खापरवाडी, विटाळी, सावरगाव शिवारातील रब्बी पिके धोक्यात सापडली आहेत. सद्य:स्थितीत शिवारात हरभऱ्याचे पीक बहरले असून, वातावरणातील बदलांमुळे किडींचे आक्रमण वाढले आहे. किडींच्या नियंत्रणासाठी शेतकरी महागड्या किटकनाशकांची फवारणी करीत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे शेतात सोंगूण ठेवलेल्या तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणखी दोन ते तीन दिवस पाऊस आल्यास तुरीला कोंब फुटण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
-----------------------------------
आगर परिसरात तूर, कपाशीचे नुकसान
आगर : परिसरात सोमवारी रात्री व मंगळवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने तूर व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
परिसरात सद्य:स्थितीत तूर सोंगणीची लगबग सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी तुरीची सोंगणी करून शेतात गंजी घातली आहे. मंगळवारी आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. तसेच कपाशी वेचणीसाठी आली आहे. पावसामुळे कपाशीचे बोंडे भिजल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरात मंगळवार दुपारनंतर रिमझिम पाऊस सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. त्यामुळे सोंगणी केलेल्या तुरीच्या पिकाला कोंब फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
----------------
पांढुर्णा : पातूर तालुक्यातील पांढुर्णा परिसरात सोमवारी रात्री अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील पांढुर्णा, चोंढी, चारमोळी, पिंपळडोळी शिवारात सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. पावसामुळे सोंगणी केलेल्या तूर व हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामात सततचा पाऊस व ढगफुटीमुळे पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. शेतकऱ्यांची मदार रब्बी पिकांवर असून, मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावताच शेतकरी धास्तावले आहेत.
-----------------------------------------
हातरूण : बाळापूर तालुक्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हातरून शिवारात हरभरा व तूर पिकांच्या सोंगणीची लगबग सुरू आहे. गत तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांची तूर सोंगणीसाठी घाई सुरू आहे. परिसरात अनेक शेतकऱ्यांनी तूरीची सोंगणी केली असून, शेतात गंजी उभारली आहे. मंगळवारी अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. हरभरा सोंगणी करून ठेवलेली गंजी शेतकऱ्यांनी ताडपत्रीद्वारे झाकूण ठेवली. तसेच बहुतेक शेतकऱ्यांच्या तुरीच्या गंजी ओल्या झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तुरीच्या शेंगांना कोंब फुटण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.