अकोला : जिल्ह्यात शुक्रवारी सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे व झालेल्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेले नगदी पीक जमीनदोस्त झाल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आधीच शेतमालाला योग्य बाजारभाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यातच पुन्हा नैसर्गिक संकटाने तर बळीराजा आर्थिक खाईत लोटला गेला आहे. नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात ५ हजार २४२ हेक्टर क्षेत्रावरील गहू, कांदा, टरबुज, पपई, भाजीपाला व लिंबू या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच १६ जनावरे दगावली असून, ४६ घरांचेही नुकसान झाले आहे. २० दिवसांमध्ये तिसऱ्यांचा गारपीटीसह पाऊस झाल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
प्रादेशीक हवामान विभागाकडून जिल्ह्यात शनिवारपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसारा, शुक्रवारी सकाळी उन्हाचा पारा चढत असताना अचानक काळे ढग दाटून येत वादळवाऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर अवकाळीच्या पावसाला जोरदार सुरुवात होऊन काही भागात गारपीटही झाली. या अवकाळीचा सार्वाधिक फटका पातूर तालुक्याला बसला असून, ३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके बाधित झाले. तसेच अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर तालुक्यातही अवकाळी पावसाचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्ताकडे सादर करण्यात आला असून, पंचनामे व सर्व्हेक्षणाची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
वीज पडून एकाचा मृत्यू, १६ जनावरे दगावली, ४६ घरांचे नुकसानजिल्ह्यात शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोला तालुक्यातील लोणाग्रा शिवारात अंगावर वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील १६ जनावरे दगावली आहेत. तसेच ४६ घरांचेही नुकसान झाले आहेत. त्यात ४५ घरांचे अंशत: तर १ घर जमिनदोस्त झाले आहे.