तेल्हारा : शहरासह तालुक्यात रविवारी (दि. १३) अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंतित सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभरा व तुरीच्या पिकांवर अळींचे आक्रमण वाढणार असल्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.
सततचा पाऊस व परतीच्या पावसाने खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. रब्बी हंगामातील पिकाची आशा असल्याने शेतकऱ्यांनी कर्ज काढून रब्बी हंगामात हरभरा, गहू पिकाची पेरणी केली. सध्या हरभऱ्याचे पीक बहरलेले असताना गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभऱ्यावर अळींचे आक्रमण वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित असून, फवारणीच्या कामांना वेग आला आहे. परिसरात अवकाळी पावसाची शक्यता असल्याने रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
--------------
तापमानात घट; आरोग्य धोक्यात
तेल्हारा शहरात १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने परिसरातील तापमानात घट झाली आहे. वातावरणात अचानक बदला झाल्यामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.