नितीन गव्हाळे। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अनेक प्राथमिक, माध्यमिक शाळा दर्जेदार शिक्षण देण्याचा दावा करतात. इंग्रजी, सीबीएसई पॅटर्ननुसार शिक्षण देण्याच्या भूलथापा पालकांना देतात; परंतु प्रत्यक्षात अनेक प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये डीएड, बीएड शिक्षक नसून, पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हय़ातील अनेक अनुदानित, विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये शिकविणार्या अप्रशिक्षित शिक्षक विद्यादानाचे कार्य करीत आहेत. त्यांच्यावर लवकरच गंडांतर येणार आहे. या अप्रशिक्षित शिक्षकांना महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्यासह शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी प्रशिक्षण घेण्यास बजावले आहे. अन्यथा, या अप्रशिक्षित शिक्षकांनी घरी बसण्याची तयारी करावी, असा इशाराही दिला आहे. राज्यातील अनेक अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये पदवीधर शिक्षक तुटपुंज्या वेतनावर विद्यादानाचे काम करीत आहेत. अनेक शिक्षक अप्रशिक्षित असूनही विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करीत आहेत. अनेक शाळा दर्जेदार, सीबीएसई पॅटर्ननुसार शिक्षण देण्याचा दावा करतात. त्यांच्या दाव्यांना बळी पडून पालकही हजारो रुपये डोनेशन भरून शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश देतात; परंतु या शाळांमधील शिक्षक वर्ग प्रशिक्षित आहे किंवा नाही, हे पडताळून पाहत नाही. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ नुसार राज्यातील शाळांमध्ये ३१ मार्च २0१९ नंतर अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक चालणार नाहीत. त्यामुळे या शाळांमधील अप्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी संसदेने प्रस्ताव पारित करून ३१ मार्च २0१९ पर्यंत मुदत दिली आहे. त्यानुसार अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांनी डीएड, बीएड ही पदविका प्राप्त करून घ्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील वैयक्तिक मान्यता दिलेल्या अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना राज्य शासनाच्या प्रशिक्षण योजनेमध्ये किंवा नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कूलिंग (एआयओएस) योजनेंतर्गत डीएड, बीएड पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. त्यासाठी अप्रशिक्षित शिक्षकांनी शासनाच्या स्वयं पोर्टलवर १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २0१७ पर्यंत अर्ज करावे. पदविका प्राप्त नसणार्या शिक्षकांना यापुढे काम करता येणार नसल्याचे विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी बजावले आहे.
आरटीई अँक्टनुसार अप्रशिक्षित शिक्षकांना आता शाळांमध्ये शिकविण्यास मनाई आहे. त्यांनी डीएड, बीएड पदविका अभ्यासक्रम पूर्ण करावा. त्यासाठी त्यांना संधी देण्यात आली आहे. अप्रशिक्षित शिक्षकांनी अधिक माहितीसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे संपर्क साधावा. - प्रकाश मुकुंद शिक्षणाधिकारी माध्यमिक