अकोला: गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या अतवृष्टीमुळे खांबोराजवळील उन्नई बंधारा ओव्हर फ्लो झाला आहे. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी दोन महिने पुरेल एवढे पाणी बंधार्यात उपलब्ध झाल्याने, ६४ गावांमध्ये निर्माण होणारे जलसंकट टळले आहे. अकोला तालुक्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध होता. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा धरणातील अत्यल्प जलसाठा गत जानेवारीमध्ये शहरासाठी राखीव करण्यात आला होता. त्यामुळे खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये गत फेब्रुवारीपासून १0 ते १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने, या गावांमधील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. गत सोमवारपर्यंत महान येथील काटेपूर्णा धरणात केवळ सहा टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यामुळे आणखी काही दिवस धरणातील जलसाठय़ात वाढ न झाल्यास दोन महिन्यांत अकोला शहरासह ६४ गावांमध्ये जलसंकटाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. दरम्यान, गत मंगळवार व बुधवारी जिल्ह्यात अतवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आले. त्यामध्ये महान धरणातील जलसाठय़ात वाढ झाली, तसेच खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी ज्या बंधार्यातून पाण्याची उचल केली जाते, तो खांबोरा जवळील उन्नई बंधारादेखील पूर्णत: भरला असून तो १६0 फूट लांब आणि चार मीटर खोल आहे. ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी दोन महिने पुरेल एवढे पाणी उन्नई बंधार्यात उपलब्ध झाल्याने, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांमध्ये निर्माण होणारी जलसंकटाची परिस्थिती तूर्त टळली आहे.
उन्नई बंधारा ‘ओव्हर फ्लो’; ६४ गावांचे जलसंकट टळले
By admin | Published: August 10, 2015 1:38 AM