लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर आलेल्या नागरिकांचा हिरमोड होत असून, नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
उरळ प्राथमिक आरोग्य केद्राअंतर्गत उपकेंद्र लोहारा व कळंबा येथे कोव्हॅक्सिन लसीकरण करण्यात येत होते. मात्र, ३१ मार्चला एकदाच लसीचे १५० डोस मिळाले व या दोन केंद्रांवर लोहारा ५० व कळंबा १०० लोकांना लस देण्यात आली. ३१ मार्चनंतर पुन्हा या लसीचा पुरवठा ग्रामीण आरोग्य विभाग, अकोला यांच्याकडून करण्यात आला नाही. शुभारंभ झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच या दोन्ही केंद्रांवरील लसीकरण ठप्प आहे. त्यामुळे लसीकरणाकरिता इच्छुक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. दुसरीकडे उरळ येथे ८ मार्च ते १६ एप्रिलपर्यंत ८४७ लोकांना कोव्हीशिल्ड लस देण्यात आली. निंबा उपकेंद्रात २५ मार्च ते १६ एप्रिलपर्यंत ७३५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसींचा अपुरा साठा असल्यामुळे सध्या फक्त उरळ केंद्रावरच लसीकरण सुरू असून निंबा, लोहारा व कळंबा केंद्रावरील लसीकरण बंद असल्याचे समजते. नागरिकांना उरळ येथे येण्याकरिता आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, आरोग्य विभागाने ग्रामीण भागात झपाट्याने पसरणारा कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता कोव्हॅक्सिन व कोव्हीशिल्ड या दोन्ही लसींचा पुरवठा उरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध करून देण्याची गरज आहे. लसीकरणाकरिता उरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला ४८०७ लसींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत १५८६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीचा पुरवठा तत्काळ झाल्यास लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्तीकरिता वैद्यकीय अधिकारी डाॅ. हर्षाली ताडे, के. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सर्व डाॅक्टर्स व आरोग्यसेविका, आशासेविका कार्यरत आहेत.