अकोला : जिल्ह्यात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, शेतकऱ्यांची खतासाठी धावाधाव सुरू आहे. त्यात युरिया खताची साठवणूक करून शेतकऱ्यांना ज्यादा दराने विक्री केल्या जात असल्याचा प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला आहे. त्यामुळे कृषी विभागाने सतर्कता दाखवित युरिया खत विक्री करणाऱ्या कृषी निविष्ठा केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आता कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत युरियाचे शेतकऱ्यांना वितरण होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी दिली. तसेच आगामी तीन-चार दिवसात पाच हजार मेट्रिक टन युरिया उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर पिकांना फटका बसला. तसेच शेतात पाणीच पाणी थांबल्याने शेताला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. पिके पाण्यात बुडाल्याने वाढ खुंटली होती. सध्या पावसाने उसंत दिल्याने शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे.
पिकांच्या वाढीसाठी युरिया उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांचा कल युरिया खताकडे वळला आहे, परंतु जिल्ह्यात शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याने धावाधाव सुरू आहे. असे असताना युरियाची कृत्रिम टंचाई दाखवून ज्यादा दाराने विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे कृषी विभाग ‘ॲक्शनमोड’ वर आला असून, कृषी निविष्ठा केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. तर आता कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत युरिया खत शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात कृषी निविष्ठा केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. तसेच आगामी दिवसात युरियाचे खत उपलब्ध होणार असून, त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आता कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत युरिया विक्री होणार असून, त्यासंदर्भात कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ज्यादा दराने विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभागाशी संपर्क करावा.
1- शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.
‘त्या’ कृषी सेवा केंद्राचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबितबाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे युरिया खताची ज्या दाराने विक्री करीत असल्याचा प्रकार समोर आला होता. यासंदर्भात कृषी विभागाने धाड टाकून कारवाई केली. कृषी विभागामार्फत त्या कृषी सेवा केंद्राचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित केल्याची माहिती आहे.