पातूर : पारंपरिक नव्हे तर बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे पेरणी करून पेरणी, मशागत आणि देखभाल खर्च वाचवा, असे मत जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. के.बी. खोत यांनी केले. पातूर तालुक्यातील ग्राम असोला येथील सुपाजी नारायण निमकाळे यांच्या शेतात बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हा कृषी अधीक्षक खोत बोलत होते.
पातूर तालुका कृषी अधिकारी डी.एस. शेटे यांनी सोयाबीनच्या अष्टसूत्रीची माहिती शेतकऱ्यांना दिली.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी इंद्रायणी थोरात यांनी बीजप्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक बी.आर. इंगळे यांनी बीबीएफ यंत्राच्या फायद्याविषयी माहिती दिली. तालुक्यात सोयाबीनची जवळपास २५ हजार हेक्टरवर दरवर्षी पेरणी केली जाते; मात्र बीबीएफ यंत्राच्या अभावाने सुमारे तीस टक्केच पेरणी केली जाते. त्यामुळे पारंपरिक पेरणी यंत्राचा वापर शेतकऱ्यांनी न करता नावीन्यपूर्ण पेरणी यंत्राचा वापर करावा, असे आवाहन आत्मा समितीचे तालुका समन्वयक मंगेश झांबरे यांनी केले. यावेळी कार्ला कृषी सहाय्यक अमोल इढोळे, विनोद देवकर, रवींद्र निबोकार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
-------------------
हे आहेत बीबीएफ यंत्राचे फायदे
यंत्रामुळे पेरणीला तीस टक्के सोयाबीन बियाणांची बचत होते. सरी-वरंबा गादी वाफा तयार होत असल्यामुळे काहीकाळ पाणी न आल्यास सोयाबीन जमिनीतल्या ओलाव्यामुळे जास्त काळ जगते. त्याबरोबरच पाऊस अधिक झाल्यास पाण्याचा निचरा तातडीने होतो. त्यामुळे पेरलेले बियाणे सडत नाही. त्याबरोबरच फवारणी करता वेळेस पिकांमधून पुरेशी जागा उपलब्ध होते. त्यामुळे साप, विंचू यापासून शेतकऱ्यांचा जीव वाचण्यास मदत होते.