अकोला: राज्य शासनामार्फत मराठी भाषा...आपली भाषा उपक्रमांतर्गत मराठी संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या या प्रयत्नांमध्ये खारीचा एक वाटा सारकिन्हीच्या जिल्हा परिषद शाळेनेसुद्धा उचलला आहे. शहरापासून कोसो अंतरावर असलेल्या ग्रामीण भागातसुद्धा मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे, यासाठी बार्शीटाकळी तालुक्यातील सारकिन्ही गावाच्या जिल्हा परिषद शाळेने घराघरात मराठी भाषा संवर्धनाचे प्रयोग सुरू केले आहेत.शहरापासून दूर असलेल्या गावखेड्यांमध्ये मराठी भाषेचे संवर्धन होणे ही मूलभूत गरज आहे. याच दृष्टिकोनातून सारकिन्हीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेने प्रयत्न चालविले आहेत आणि हे प्रयत्न गावखेड्यातील आईला माहीत व्हावे, यासाठी शाळेतील बालवाचनालयातील एक पुस्तक मुली दररोज घरी नेतात. सायंकाळी थकूनभागून कामावरून घरी आलेल्या आपल्या आईला संध्याकाळच्या जेवणानंतर वाचून दाखवितात. त्यातून गावखेड्यातल्या या माउलीला मराठी भाषा उमगते, मराठी भाषेविषयी आपलेपणा निर्माण होतो. एवढेच नाहीतर संक्रातीचे वाण देण्याच्या परंपरेत बदल करून येथील सावित्रीच्या लेकींनी वाण म्हणून पुस्तकांचेच दान देण्याच ठरवून, घराघरातून पुस्तकांचा अमूल्य ठेवा वाचनालयाला मिळाला. यासाठी प्रयोगशील शिक्षक ब्रह्मसिंग राठोड, अमोल सराफ, मोहन पुंपलवाल, सुनीता जोशी हे सातत्याने प्रयत्न करतात. गावामध्ये सोयी-सुविधाअभावी साहित्य संमेलन भरणार नाही; परंतु भाषा संवर्धनाचा सुगंध सदैव दरवळत राहील.वाचनाची प्रयोगशील पायवाट...शाळेने रोटरी क्लब, सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पुस्तके मिळवून शाळेतच छोटेसे बालवाचनालय साकारले. यातून सर्व मुले-मुली मराठी भाषेची पुस्तक वाचनाचा आनंद लुटतात. पालक शाळाभेटीला आल्यावर बालवाचनालयातून मराठी भाषा मुलांमध्ये कितपत रुजली आहे, याचा मागोवा घेतात. मुलांची भाषेतील, वाचनातील प्रगती पाहून, त्यांच्या चेहऱ्यावरही समाधान झळकते.वाचू आनंदे ऐकू आनंदे...शाळेमध्ये वाचू आनंदे...ऐकू आनंदे...उपक्रम राबविला जातो. उपलब्ध पुस्तकातून विविध कलाकृतींचा आनंद विद्यार्थ्यांना दिला जातो. वाचलेल्या पुस्तकातील कथा, अनुभव हे शाळेला भेट देणाऱ्या मान्यवरांसमोर शाळेतील विद्यार्थी कथन करतात आणि यातूनच अनुभवरूपी माय मराठी समृद्ध होते.
विद्यार्थ्यांसोबतच पालकांना वाचनाची गोडी लागावी यासाठी शाळेतर्फे मराठा भाषा संवर्धनाचा उपक्रम राबविला जातो. बालवाचनालयातील पुस्तके विद्यार्थ्यांना घरी देण्यात येतात. विद्यार्थी ही पुस्तके आई-वडिलांना वाचून दाखवितात. सारकिन्हीसारख्या ग्रामीण भागातील शाळेत होत असलेला हा उपक्रम मराठी भाषा समृद्धीसाठी मोलाचा ठरेल.-ब्रह्मसिंग राठोड, प्रयोगशील शिक्षकजि.प. शाळा, सारकिन्ही