अकाेला: काेराेनाच्या पहिल्या टप्प्यात वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, बाहेरून घरी गेल्यावर अंघाेळ करण्यात दक्षता घेणारे नागरिक काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेताच बेफिकीर झाले हाेते. वारंवार हात धुण्याचे प्रमाण कमी झालेच हाेते; मात्र सॅनिटायझरचाही वापर कमी झाला हाेता. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून काेराेनाचा कहर वाढताच सॅनिटायझरची विक्री पुन्हा वाढली आहे.
गेल्या मार्च महिन्यात काेराेनाची दहशत सुरू झाल्यानंतर वैयक्तिक दक्षता घेण्यात नागरिक पुढे हाेते. दिवाळीपर्यंत ही दक्षता कसाेशीने पाळल्या गेली; मात्र ऑक्टाेबरनंतर काेराेनाचा प्रादुर्भाव मंदावताच नागरिकांमधील बेफिकिरी पुन्हा वाढली; मात्र फेब्रुवारी महिन्यापासून आता पुन्हा काेराेनाची दहशत सुरू झाली आहे. दरराेजची वाढती रुग्णसंख्या अन् मृत्यूचे सत्र पाहता नागरिकांनी दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. आता प्रत्येकाजवळ पुन्हा सॅनिटायझरची बाॅटल दिसू लागली आहे.
सॅनिटायझरची
मागील वर्षाची विक्री
९५ टक्के
या वर्षाची विक्री
८० टक्के
मास्कची विक्री
९० टक्के
काेट
काेराेनाचा प्रभाव ओसरल्यावर सॅनिटायझरची विक्री घटली हाेती; मात्र गेल्या महिन्यापासून विक्री पुन्हा वाढली आहे. ती मागील वर्षाच्या तुलनेत कमी असली तरी काेराेना मंदावला हाेता त्या वेळपेक्षा जास्तच आहे.
प्रकाश सावल, औषध विक्रेता
काेट
काेराेनाची वाढती रुग्ण संख्या पाहता वैयक्तिक काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मास्क व सॅनिटायझरचा मी नियमित वापर करते. कार्यालयात वारंवार हात धुणे शक्य नसल्याने सॅनिटायझरचा वापर संयुक्तिक आहे.
दीपशिखा शेगाेकार
काेट
सॅनिटायझरचा वापर मध्यंतरी थांबविला हाेता. काेराेनाचा कहरही कमी झाला हाेता. त्यामुळे बेफिकीर झालाे हाेताे. हे खरे आहे; मात्र आता पुन्हा सॅनिटायझरचा वापर करत आहे. स्वत:ची काळजी घेतलीच पाहिजे. त्यामुळे सर्वांनीच वापर करावा.
महादेव महाकाळ
यामुळे वाढली मागणी
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून साेमवार, १५ मार्चपर्यंत काेराेनाबळींचा आकडा ४०२ एवढा झाला आहे. मृत्यूचे सत्र दरराेज कायम असल्याने नागिरकांमध्ये धास्ती आहे.
जिल्हा प्रशासनाने घाेषित केलेला लाॅकडाऊन मागे घेतल्यामुळे बाजरपेठेतील गर्दी पुन्हा वाढली आहे. नागिरकांना विविध कामांसाठी घराबाहेर जावे लागत आहे. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझरचा वापर हाेताे.
कामाच्या ठिकाणी वारंवार हात धुणे शक्य नसल्याने मास्क व सॅनिटायझर या दाेन गाेष्टींना प्राधान्य दिले जात आहे. साहजिकच मागणी वाढल्याचे दिसत आहे.