लोकमत न्यूज नेटवर्कअकोला/अकोट : वर्गात शिकवत असताना नको तेथे स्पर्श करून विद्यार्थीनीला शिक्षकाने धमकी दिल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी उडकीस आली. या प्रकरणी आरोपी शिक्षक जयंत श्रीकृष्ण वावगे याला अकोट शहर पोलिसांनी अटक केली. शिक्षक जयंत वावगे हा कृषी विद्यालयात (सध्याचे भाऊसाहेब पोटे विद्यालय अकोट) कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या घटनेमुळे पालकात रोष व्यक्त होत असून, एकच खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेने अकोट शहरातील शाळा बंदचे आवाहन केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक जयंत वावगे याने वर्गामध्ये शिकवत असताना पाचव्या वर्गाच्या १0 वर्षीय विद्यार्थिनीला होमवर्क दाखविण्याच्या उद्देशाने नको तेथे स्पर्श केला. तसेच तुला जे काही केले हे घरी सांगशील, तर तुझ्या आई-वडिलांना मारून टाकील, अशी धमकी दिली. या धमकीनंतर विद्यार्थिनी भेदरल्याने ती घटना घडल्यापासून शाळेत गेलीच नाही. त्यामुळे आई-वडिलांनी व नातेवाइकांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली असता, तिने वर्गात शिक्षक वावगे याने केलेला प्रकार सांगितला. त्यामुळे मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. फिर्यादीत नमूद आरोपाखाली जयंत श्रीकृष्ण वावगे रा. नयाप्रेस याचे विरुद्ध भादंवि ३५४ अ, ५0६, पास्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता डी.बी. स्कॉडचे पथक पाठवून आरोपीला अटक केली. यापूर्वीसुद्धा शाळेमध्ये अशा स्वरूपाची घटना घडली होती. ही घटना घडल्यानंतरही मुलीच्या आई-वडील व नातेवाईकांनी शाळेशी संपर्क साधला, परंतु आठ दिवसांपासून कोणीही प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, शिक्षक जयंत वावगे याने यापूर्वी अनेकदा असे प्रकार केले असल्याच्या तक्रारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, अहवाल पोलिसांना अद्याप प्राप्त झाला नाही. या प्रकरणी पोलीस कसून तपास करीत असून, दोषी असणार्याविरुद्ध कठोर कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गवई करीत आहेत.
सर्व शाळा बंद ठेवण्याचे शिवसेनेचे आवाहन शाळेमध्ये विद्यार्थिनीसोबत घडलेली घटना निषेधार्थ आहे. अशा घटनांमुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणावर परिणाम होतो. घटना घडल्यानंतर शाळेशी संपर्क साधल्यानंतरही पालकांचे समाधान केले जात नसल्याने समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे. अशा घटनेच्या निषेधार्थ अकोट शहरातील सर्व शाळा आज बंद ठेवण्याचे आवाहन शिवसेनेच्यावतीने उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, तालुकाप्रमुख श्याम गावंडे, शहरप्रमुख सुनील रंधे यांनी केले आहे. संस्था चालकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी अशा घटनेला आळा घालण्याकरिता शिवसेनेच्या शाळा बंद आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत असल्याचे दिलीप बोचे यांनी सांगितले.