सज्रेराव देशमुख / धाड देश स्वतंत्र होऊनही संस्थानिकांची सत्ता अबाधित होती, असाच प्रकार हैदराबाद संस्थानमध्ये होता. येथील प्रांताचा सत्ताधिश चाऊस रझाकार यांच्या उपद्रवाने त्रस्त झालेल्या मराठवाड्यातील जनतेच्या रक्षणासाठी वर्हाड प्रांतातील सीमारेषेवरील असलेल्या गावांमधून मोठय़ा प्रमाणात तरूण स्वातंत्र्य लढय़ात सहभागी झाले होते. अनेकांनी ऐनतारूण्यात देशसेवेसाठी सर्वस्व पणाला लावले. धाड परिसरातील धामणगाव, सातगाव म्हसला, धाड येथील स्वातंत्र्य सैनिकांचा त्यात समावेश असून, आज धाड येथील लक्ष्मणराव मिसाळ गुरूजी हे एकमेव स्वातंत्र्यसैनिक वयाच्या ९८ व्या वर्षी लढय़ाचा जोषपूर्ण इतिहास सांगताना रोमांचित होतात.धाड परिसरातील विविध गावांमध्ये हैदराबाद संस्थानचा चाऊस रझाकारचा उपद्रव असह्य झाल्यामुळे तत्कालीन तरूणांनी स्वत:ला स्वातंत्र्यलढय़ात झोकून दिले. धामणगाव येथील रमेश पाटील, सातगाव म्हसला येथील जुलालसिंग राजपूत, रामराव पालकर, तर धाड येथील शंकर जाधव, लक्ष्मण जगताप या वर्हाडवीरांनी हैदराबाद लष्करावर हल्ला करणे, हैदराबाद पोलिसांविरूद्ध कारवाया करणे यासाठी वर्हाडातील गिरडा, जांभोरा, देऊळगाव राजा येथे प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून रझाकराविरूद्ध लढाईत तरूणांनी देशभक्ती पणाला लावली. रझाकरांनी वर्हाडात येणार्या आणि वर्हाडातून मराठवाड्यात जाणार्या प्रत्येक बैलगाडी, वाहने आणि व्यक्तींवर अन्यायकारक कर आकारणी केली होती. त्यासाठी सीमारेषेवरील रस्त्यावर नाके उभारले होते. आजही कनेरगाव, वरूड, पद्मावती येथे नाके इमारती आहेत. जुल्मी शासनाला धडा शिकवण्यासाठी धामणगाव आणि पारध रस्त्यावरील धामणा नदीत गस्त घालणार्या हैदराबाद पोलिसांवर वीर वामनराव लोखंडे यांच्या नेतृत्वात धामणगावच्या रमेश पाटील व सहकार्यांनी हल्ला करून त्यांची शस्त्रे हिसकावून घेतली. उसाच्या शेतातून दगडफेक करून पिटाळून लावले. स्वा तंत्र्यदिनी पद्मावती नाक्यावर राष्ट्रध्वज फडकवला. अशा अनेक राष्ट्रप्रेमी घटनांनी लक्ष्मणराव मिसाळ गुरूजींनी लढय़ाच्या आठवणी ताज्या केल्या.
व-हाडवीरांनी लढला हैदराबादमुक्तीचा लढा
By admin | Published: September 17, 2014 12:56 AM