अकोला : शहरात स्वमालकीचे घर असतानाही शासकीय निवासस्थानात ठाण मांडून असलेल्या अधिकारी-कर्मचाºयांनी तातडीने निवासस्थाने रिकामी न केल्यास प्रशासनाची दिशाभूल केल्याने दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाच्या मोर्णा प्रकल्प शाखा अभियंत्यांनी कर्मचाºयांना नोटीसमधून दिला आहे.पाटबंधारे विभागीय कार्यालयाने ५ आॅक्टोबर २०१८ रोजीच त्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्वमालकीचे घर असलेल्या अधिकारी-कर्मचाºयांनी शासकीय निवासस्थान रिक्त करणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही. त्याचवेळी ज्यांनी शासकीय निवासस्थानात ठाण मांडले. त्यांच्याकडून आई-वडील, वडिलोपार्जित जमीन, सासू-सासरे यांच्या नावे घर असल्यास व शासकीय कर्मचारी त्यांच्यासोबत राहत नसल्यास रेशन कार्डसह बंधपत्रही लिहून घेण्याचे बजावण्यात आले. बंधपत्रात नमूद माहिती संबंधित कार्यालयाचे कार्यकारी अभियंत्या यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय, घरबांधणी अग्रिम घेतला असल्यास त्यानंतर पुढे काय झाले, याची माहितीही मागविण्यात आली. त्यानंतरही घर असलेले शासकीय निवासस्थानात राहत असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मोर्णा प्रकल्पाचे शाखा अभियंत्यांनी नोटीसमधून दिला आहे.