अकोला: बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याच्या भीतीने बाळापुरातील पालकांनी थेट लसीकरणालाच विरोध करण्याचा प्रकार घडला. त्याचवेळी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बाळापुरातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने हा विरोध कमी झाला. त्यामुळे आधी नकार देणाऱ्या पालकांनी नंतर उद्दिष्टापेक्षाही अधिक म्हणजे, बालकांचे १०५ टक्के लसीकरण करून घेतले. त्यांच्यातील गैरसमज दूर करण्यात अधिकारी-लोकप्रतिनिधींचे प्रयत्न यशस्वी झाले.आरोग्य विभागाकडून मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक लसीकरणासोबतच त्यांची आरोग्य तपासणीचा उपक्रम सुरू झाला. त्यामध्ये ७ जानेवारीपर्यंत उद्दिष्टाच्या २० टक्केच काम झाले होते. बाळापूर शहरातील पालकांनी लसीकरणाला प्रतिसाद न देता विरोधाची भूमिका घेतली. त्या लसींमुळे बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे बाळापूर शहरात या मोहिमेचा फज्जा उडण्याची चिन्हे होती. या बाबीची दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वत: उपस्थित राहून पालकांचे समुपदेशन केले. सोबतच नगराध्यक्ष, नगरसेवकांनीही पालकांशी संपर्क केला. त्यामुळे बाळापूर ग्रामीण रुग्णालयात उद्दिष्टाच्या १०५ टक्के लसीकरण झाले. शहरातील ० ते २ वर्षे वयोगटातील ४८३ बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यामध्ये ५०५ बालकांचे लसीकरण करण्यात आले, तर ४१ पैकी ३८ गर्भवती मातांना लसीकरण करण्यात आले. शहरातील ३६४६ माता व बालकांच्या विशेष तपासणीनंतर औषधोपचार करण्यात आले.शिबिरासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. डी. राठोड, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनीष शर्मा, वैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ज्ञ डॉ. विनीत वरठे, डॉ. इंद्रायणी मिश्रा, डॉ. रमेश पवार, स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांनी प्रयत्न केले.