९९० जणांचे घेतले स्वॅब
अकाेला: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी मनपा व जिल्हा प्रशासनाच्यावतीने संपूर्ण शहरात संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्याला प्रारंभ करण्यात आला आहे. गुरूवारी शहराच्या विविध भागात स्वॅब घेण्याची माेहीम राबवण्यात आली असता ९९० व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले. संबंधितांचे नमुने पुढील चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
शहरात १२९ व्यक्ती काेराेना पाॅझिटिव्ह
अकाेला: शहरात काेराेनाचा माेठ्या प्रमाणात संसर्ग पसरला आहे. त्या अनुषंगाने मनपाने चाचणी घेण्याला सुरूवात केली असता गुरूवारी शहरातील १२९ व्यक्तींना काेराेनाची लागण झाल्याचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला आहे. यामध्ये सर्वाधिक पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या पूर्व व दक्षिण झाेनमध्ये असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.
मास्क नाही;२९ हजार रुपये दंड
अकाेला: शहरात काेराेनापासून स्वत:चा व इतरांचा बचाव करता यावा,यासाठी मनपाने मास्क न लावणाऱ्या नागरिकांविराेधात कारवाइचे हत्यार उपसले आहे. गुरूवारी महापालिका, महसूल व पाेलिस प्रशासनाने गठीत केलेल्या संयुक्त पथकांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अकाेलेकरांजवळून २९ हजार ६०० रुपये दंड वसूल केला. ही कारवाइ अधिक तिव्र केली जाणार आहे.
रस्त्यांवर वाहने;वाहतुक विस्कळीत
अकाेला:पंचायत समिती ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. या दाेन्ही कार्यालयात विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी राहते. पंचायत समिती ते मनपाच्या अग्निशमन विभाग कार्यालयापर्यंत रस्त्यावर दाेन्ही बाजूने दुचाकी वाहने उभी केली जात आहेत. यामुळे वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
‘पीएम’आवासचे लाभार्थी प्रतीक्षेत
अकाेला: केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास याेजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देणे महापालिकेची जबाबदारी असताना प्रशासनाकडून लाभार्थ्यांची हेटाळणी केली जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे घरकुलसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांवर मनपाचे हेलपाटे घेण्याची वेळ आली असून असंख्य लाभार्थी हक्काचे घर मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
गुटख्याची खुलेआम विक्री
अकाेला: शहरातील पानटपरी व गल्लीबाेळातील दुकानांमधून गुटखा व प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थांची खुलेआम विक्री केली जात आहे. शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात विक्री हाेत असताना अन्न व औषधी प्रशासन तसेच पाेलिस प्रशासनाकडून डाेळेझाक केली जात असल्याचे चित्र आहे. याप्रकाराकडे महाविद्यालय व्यवस्थापनासह पाेलिस प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
सिग्नल व्यवस्था उभारा!
अकाेला: शहरातील वाशिम बायपास चाैकात सिग्नल व्यवस्था नसल्यामुळे याठिकाणी वाहतुकीची काेंडी हाेत आहे. या चाैकातून पातूर, खामगाव, मेहकर आदी गावांना जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे चाैकात जड वाहनांसह प्रवासी वाहतुकीची माेठी वर्दळ राहते. याठिकाणी तातडीने सिग्नल व्यवस्था उभारण्याची मागणी निवेदनाद्वारे वाहतूक शाखेकडे केली आहे.
काैलखेड चाैकाला अतिक्रमणाचा विळखा
अकाेला:शहरातील काैलखेड चाैकाला अतिक्रमणाचा विळखा पडला असून मुख्य रस्त्याच्या दाेन्ही बाजूला भाजीपाला विक्रेता, फळ व्यावसायिकांसह विविध साहित्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. या चाैकातून जड वाहतुकीसह प्रवासी वाहनांची माेठी वर्दळ दिसून येते. गुरूवारी अतिक्रमणाच्या समस्येमुळे चाैकात वाहतुकीचा खाेळंबा निर्माण झाला हाेता.