अकोला : मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत बाळापूर शहरातील ० ते ५ वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला लसीकरणासोबतच त्यांची आरोग्य तपासणी व्हावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.बाळापूर ग्रामीण रुग्णालयात मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत बुधवार ८ जानेवारी रोजी आयोजित विशेष आरोग्य तपासणी शिबिर व लसीकरण कार्यक्रमासंदर्भात सोमवारी विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी मोहिमेच्या यशस्वितेसाठी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.डी. राठोड, नगराध्यक्ष एन्नोद्दीन खतीब, नगरसेवक मो. मजहर, किशोरचंद्र गुजराथी, अमजद हुसेन, नासीर हुसेन, मो. सलीम, मुशीर उल हक, खुर्शीद अहमद, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास चरपे, शेख मेहबुब, नगर परिषदेचे अधिकारी तैय्यब अहमद कादरी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. मिशन इंद्रधनुष्यसाठी नगराध्यक्ष, नगरसेवक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा तसेच शालेय आरोग्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. आरोग्य शिबिरात एखादा गंभीर रुग्ण आढळल्यास त्यावर उपचार करून अशा रुग्णांना संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहे. शिबिराच्या नियोजनासाठी जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मानकर, जिल्हा लेखा व्यवस्थापक दीपक मलखेड, ए.एच. गिरी तसेच बाळापूर ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी व इतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.