- अतुल जयस्वाल
अकोला : कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या धास्तीने नियम अधिक कठोर करण्यात आले असून, अनेक कामांसाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे. रेल्वेने प्रवास करण्यासाठी मात्र अद्यापही ही सक्ती लागू करण्यात आली नाही. दरम्यान, मेमूसारख्या खिडकीवरून तिकीट विक्री होत असलेल्या गाड्यांमध्ये मात्र लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे, त्याशिवाय तिकीट मिळत नाही.
ओमायक्रॉनने डोके वर काढल्याने लसीकरणावर भर दिला जात असून, केरळसारख्या काही राज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. महाराष्ट्रात अनेक शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांना प्रवेश दिल्या जात आहे. रेल्वेत मात्र अद्यापही हा नियम लागू करण्यात आला नाही. ऑनलाइन तिकीट बुक करून कोणीही रेल्वेने प्रवास करू शकतो. कुठेही लसीकरण प्रमाणपत्राची सक्ती केली जात नाही. अकोला स्थानकावरून जाणाऱ्या बडनेरा- भुसावळ या मेमू गाडीचे खिडकीवरून तिकीट घेताना मात्र लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागते. प्रमाणपत्र नसेल, तर तिकीट दिले जात नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस
मुंबई- हावडा, अमरावती- सुरत, गोंदिया- मुंबई, हावडा- पुणे, नागपूर- पुणे, हावडा- अहमदाबाद, मुंबई- नागपूर.
या ठिकाणी थांबे कधी मिळणार
पॅसेंजर गाड्या लहान- मोठ्या सर्वच स्थानकांवर थांबत होत्या. आता या गाड्या बंद झाल्यामुळे जिल्ह्यातील पारस, गायगाव, यावलखेड, बोरगाव मंजू, कुरणखेड, काटेपूर्णा, कुरूम या छोट्या स्थानकांवर रेल्वे गाड्या थांबत नाहीत.
दिवसाला ४२ हजारांचे उत्पन्न
मध्य रेल्वेच्या अकोला स्थानकावरून दररोज ९० गाड्यांचे अवागमन होते. सध्या भुसावळ- बडनेरा- भुसावळ या एकमेव मेमू गाडीसाठी खिडकीवरून तिकीट विक्री होत आहे. यामधून दररोज किमान ४२ हजार रुपयांचे उत्पन्न अकोला स्थानकाला होते. ऑनलाइन बुकिंग व आरक्षण खिडकीवरूनही स्थानकाला मोठी कमाई होते.
मेमू गाडीमध्ये लस नाही, तर तिकीट नाही
अकोला स्थानकावरून जाणाऱ्या मेमू गाडीसाठी खिडकीवरून तिकीट विक्री केली जाते. तिकीट घेण्यापूर्वी लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविणे अनिवार्य आहे. गाडीतही प्रवाशांकडे प्रमाणपत्र असल्याची खात्री करण्यासाठी तपासणी केली जाऊ शकते.
लसीकरण गरजेचे असले, तरी त्याची सक्ती नको. तिकीट खिडकीवर लसीकरण प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय तिकीट देत नाहीत. ऑनलाइन बुकिंग करताना मात्र कुठेही प्रमाणपत्र सक्तीचे नाही.
-विशाल देशमुख, प्रवासी
लसीचा एक डोस घेऊन झालेला आहे. त्यामुळे माझ्याकडे प्रमाणपत्र नाही. दुसऱ्या डोसची तारीख अजूनही लांब आहे. त्यामुळे प्रवासासाठी लसीकरण प्रमाणपत्राची सक्ती नसावी, असे वाटते.
-मनोज हातोले, प्रवासी