------------
भांबेरी येथे १७३ जणांना लस
भांबेरी: येथील आरोग्य केंद्रात लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, १७३ जणांना लस देण्यात आली. यावेळी डॉ.गवई, ढवळे, वागोळे, शरद वाघ आदींनी परिश्रम घेतले.
------------
वाहाळा येथे वीज तार तुटल्या!
वाहाळा बु: पातुर तालुक्यातील वाहाळा बु. येथे अचानक पावसाचे आगमन झाले असता, वादळी वाऱ्यामुळे विजेचा तार तुटून पडल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. वीज तारा तुटल्याने गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
------------------
दहावीचा निकालाबाबत विद्यार्थी संभ्रमात!
अकोला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शासनाने अखेर इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. दहावीचा निकाल कसा लागेल, त्याचे सूत्र कसे असेल आदी प्रश्न उपस्थित झाले होते.
-------------------------
शेणखताकडे वाढला शेतकऱ्यांचा कल!
तेल्हारा : परिसरात पेरणीस सुरुवात झाली आहे. रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने या वर्षी शेतकऱ्यांचा कल शेणखताकडे वाढला आहे. बियाण्यांचे दरही वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेणखताचे भावही वाढल्याचे चित्र आहे.
-------------------------
बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी
बाळापूर: तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसल्याचे चित्र आहे. पेरणी सुरू हाेण्यापूर्वी प्रशासनाने शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे.
------------------------
जिल्ह्यात गुरांचे लसीकरण रखडले!
अकोला: कोरोना लसीकरण लांबलेले असतानाच, जनावरांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तोंडखुरी, पायखुरी आदी आजारांपासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना दरवर्षी नोव्हेंबर आणि मे महिन्यांत हे लसीकरण केले जाते.
------------------------
शाळा सुरू हाेण्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा!
पातूर: सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, रुग्णसंख्या कमी हाेत आहे. लसीकरणाचा वेग वाढविल्यास शाळा सुरू करणे शक्य हाेणार आहे. दाेन वर्षांपासून घरातच असलेल्या मुलांना शाळा सुरू हाेण्याची प्रतीक्षा आहे.
------------------------------
वीजपुरवठा वारंवार खंडित; ग्रामस्थ त्रस्त
खेट्री : सस्ती येथील उपकेंद्राचा कारभार वाऱ्यावर असल्याने, परिसरातील गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
-----------------------------