लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : हृदयराेगी, किडणीचे विकार असलेले, दुर्धर आजार असलेले असा कुठलाही आजार असलेल्या सर्वांनीच काेराेना प्रतिबंधक लस घ्यायला हवी,असे मत तज्ज्ञ डाॅक्टरांनी व्यक्त केले.जिल्ह्यात २ मार्चपासून दुर्धर आजार असलेल्या व ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांसाठी काेराेना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. काेराेना लस घेण्यासाठी ऑनलाइन नाेंदणी करावी लागते. त्यानंतर लस घेण्याविषयी संदेश येताे. लसीकरण सुरू हाेउन पाच ते सहा दिवस झाले असले तरी विविध केंद्रावर दुर्धर आजार असलेल्यांची संख्या कमी आहे. अनेकांना लसीविषयी गैरसमज झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे लस घेण्याकडे दुर्धर आजार असलेल्या रुग्णांचा कल कमी असल्याचे चित्र आहे. ४ मार्च राेजी जिल्ह्यातील २९९ दुर्धर आजारी असलेल्यांनी काेराेना लसीचा पहिला डाेज घेतला. तसेच ७६० ज्येष्ठांना जिल्ह्यातील विविध केंद्रांवर लस देण्यात आली. ५ मार्च राेजी २१० दुर्धर आजार असलेल्या रुग्णांनी लस घेतली आहे. ६ मार्च राेजी ३३३ जणांनी ही लस घेतली. तसेच १२०३ ज्येष्ठांनी लसीचा पहिला डाेज घेतला आहे. दुर्धर आजार असलेल्यांनी काेराेना लस घेउन राेग प्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज आहे.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी काेराेनाची लस सुरक्षित आहे. या लसीचे कुठलेही दुष्परिणाम हाेणार नाहीत. त्यामुळे, मधुमेहाचा आजार असलेल्या रुग्णांनी काेविशिल्ड लस घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. तज्ज्ञ डाॅक्टरांशी संवाद साधून आपले गैरसमज दुर करून घ्यावे.- डाॅ. अश्विनी जाधव, मधुमेहतज्ज्ञ,
हदय राेग असलेल्या रुग्णांनाही काेविशिल्ड लसीपासून कुठलाही धाेका नाही. ही लस पूर्णपणे सुरक्षीत आहे. लस घेतल्यामुळे राेगप्रतिकारक शक्ती वाढून काेराेनापासून हाेणारे दुष्परिणाम टाळता येउ शकतात.- डाॅ.पंजाबराव शेजाेळ, हदयराेग तज्ज्ञ
दुर्धर आजार असलेल्या लाेकांना काेराेनापासून सर्वाधिक धाेका आहे. अशा रुग्णांनी काेराेनाची लस घेउन राेगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज आहे. इंजेक्शनची अॅलर्जी असलेले रुग्ण साेडून इतर दुर्धर आजार असलेल्यांसाठी लस सुरक्षीतच आहेत. - डाॅ.सचिन वासेकर, फिजिशियन
काेराेनाची लस राेगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहे. त्यामुळे, किडणीचे आजार असलेल्या रुग्णांसाठीही ती सुरक्षीतच आहेत. डायलीसी किंवा गंभीर आजार असलेल्या रुग्णांनी तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घेउन लस घ्यावी. - डाॅ.संदीप पऱ्हाड, युराे सर्जन