अकाेला : बार्शीटाकळी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रामध्ये काेविड लसीकरण सुरू आहे. शनिवारी लसीकरणासाठी लागलेल्या रांगेत दाेन रुग्णांमध्ये काेराेनाची लक्षणे प्रथमदर्शनीच आढळून आल्यावर त्यांची तत्काळ रॅपिड टेस्ट केली असता ते काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे समाेर आले. हा प्रकार पाहता लसीकरण केंद्र काेराेनाचे सुपरस्प्रेडर ठरू शकतात, अशी भीती निर्माण झाली आहे.
कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लस दिली जाणार आहे. या गटातील लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्याने त्या तुलनेत लसीची मागणीही वाढली आहे. दुसरीकडे ज्यांनी पहिला डाेस घेतला आहे त्यांना दुसऱ्या डाेसची प्रतीक्षा असल्याने लसींचा तुटवडा लसीकरण केद्रांवरील वाढती गर्दी काेराेनाचे सुपरस्प्रेडर सेंटर ठरण्याची भीती आहे. शनिवारी प्राथमिक आराेग्य केंद्रावरील बार्शीटाकळीच्या लसीकरणासाठी लागलेल्या रांगेत दाेन रुग्णांबाबत आराेग्यसेवक यांना शंका आली. त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून या दाेघांशी संवाद साधून त्यांना काय त्रास हाेताे हे जाणून घेतले. प्रथमदर्शनी या दाेघांमध्येही काेराेनाची लक्षणे आढळून आल्यावर त्यांना रांगेतून बाहेर काढत त्यांची ॲन्टिजेन टेस्ट केली असता ते काेराेना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना तत्काळ विलगीकरण कक्षात नेण्यात आले. आराेग्यसेवक यांच्या समयसूचकतेमुळे व जागरूकतेमुळे हे दाेन रुग्ण समाेर आले असले तरी प्रत्येक केंद्रावरील रांगेत असे संदिग्ध रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रामध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम काेटेकाेर पाळण्याची गरज आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना लसीकरणाचा मोठा आधार आहे. मागील चार महिन्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. लसीकरणाला लाभार्थ्यांचा प्रतिसादही मिळत आहे. परंतु, गरजेनुसार लस उपलब्ध होत नसल्याने अनेक केंद्र बंद पडत आहेत. जिल्ह्यात १ एप्रिलपासून १५३ केंद्रांवर कोविड लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. आठवडाभर यशस्वी चाललेल्या लसीकरणानंतर लसीचा तुटवडा भासल्याने लसीकरण केंद्र बंद पडण्यास सुरुवात झाली. कधी कोविशिल्ड, तर कधी कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध नसल्याने केवळ एकच लस लाभार्थ्यांना दिली जात आहे. त्यामुळे लसीच्या दुसऱ्या डोसच्या लाभार्थ्यांना लस न घेताच परतावे लागत आहे. मागील तीन दिवसांपासून लस नसल्याने महापालिका क्षेत्रात लसीकरण मोहीम ठप्प पडली होती. अशा परिस्थितीत १ मेपासून
तरुणांसाठी माेहीम सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी लसीकरण केंद्रावर युवकांची प्रचंड झुंबड उडाली हाेती. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडला हाेता. मास्कबाबतही तरुणाई फारशी गंभीर दिसून आली नाही त्यामुळे लसीकरण केंद्र सुपरस्प्रेडर ठरण्याचा धाेका वाढला आहे.
बाॅक्स......
पाण्याची बाॅटल आणण्यासाठी रुग्णच दुकानावर
बार्शीटाकळीच्या प्राथमिक आराेग्य केंद्रात विलगीकरण कक्ष उभारला असून शनिवारी या कक्षात १५ रुग्ण हाेते. यापैकी एका रुग्णाला शुद्ध पाण्याची बाॅटल हवी हाेती. त्यामुळे या रुग्णाने थेट विलगीकरण कक्षातून बाहेर येत आराेग्य केंद्रासमाेरील एका दुकानावरून पाण्याची बाॅटल विकत आणल्याचा प्रकार एका सजग नागरिकाने तेथील आराेग्य कर्मचाऱ्याच्या कानावर घातला. या विलगीकरण कक्षासमाेर दक्षतेसाठी एकही कर्मचारी मिळत नसल्याची तक्रारही आराेग्य कर्मचाऱ्यांनी केली.