अकोला : कोविड लसीकरणाच्या रंगीत तालमीनंतर आता १६ जानेवारी रोजी जिल्ह्यात प्रत्यक्ष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. हे लसीकरण जिल्ह्यातील चार केंद्रांवर केले जाणार असून पहिल्या दिवशी ४०० लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाले असून, लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
गत आठवड्यात ८ जानेवारी रोजी जिल्ह्यात कोविड लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली होती. यावेळी आलेल्या काही तांत्रिक तृट्या दूर करून प्रत्यक्ष लसीकरणासाठी आरोग्य विभाग सज्ज झाले आहे. लसीकरणाचा पहिला टप्पा १६ जानेवारी रोजी पार पडणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील चार केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रावर प्रत्येकी १०० जणांना लस दिली जाणार आहे. लसीकरण मोहिमेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता होणार असून सायंकाळी ५ वाजतापर्यंत लसीकरण चालणार आहे.
या केंद्रावर होणार लसीकरण
जिल्हा स्त्री रुग्णालय
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय
ग्रामीण रुग्णालय, बार्शिटाकळी
महापालिका अंतर्गत ऑर्बिट हॉस्पिटल
१५ तारखेला लाभार्थ्यांना जाईल ‘एसएमएस’
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांची नोंदणी यापूर्वीच करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी ४०० जणांची लसीकरणाच्या पहिल्या दिवशी निवड केली जाणार आहे. या लाभार्थ्यांना १५ तारखेला ‘कोविन’ॲपद्वारे एसएमएसच्या माध्यमातून लसीकरणासंदर्भात माहिती कळविण्यात येणार आहे.
‘एमआर’ लसीकरणचा अनुभव ठरणार महत्त्वाचा
जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी गोवर आणि रुबेला आजारासाठी ‘एमआर’ लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. शालेय स्तरावर लहान मुलांना ही लस देण्यात आली होती. ही लसदेखील पहिल्यांदाच उपयोगात आणली गेली होती. काही ठिकाणी मुलांना चक्कर येण्याच्या घटना घडल्या होत्या, परंतु हा प्रकार भीतीमुळे झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. एमआर लसीकरणामुळे कुठला दुष्परिणाम झाल्याची घटना घडली नाही. या लसीकरणाचा अनुभव कोविड लसीकरण मोहिमेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
लाभार्थ्यांना दिला जाईल आपत्कालीन क्रमांक
लसीकरणानंतर लाभार्थी घरी गेल्यावर त्याला कुठलाही त्रास झाल्यास त्यांनी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक केंद्रावर लसीकरणानंतर लाभार्थ्यांना आपत्कालीन संपर्क क्रमांक दिला जाणार आहे. या क्रमांकावरच संबंधितांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा.
१६ जानेवारी रोजी जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील कोविड लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यासाठी चार केंद्रांची निवड करण्यात आली असून पहिल्या दिवशी ४०० लाभार्थ्यांना लस दिली जाईल. लसीकरणानंतर लाभार्थ्यांनी संतुलित आहार घ्यावा, तसेच आराम करावा. काही त्रास होत असल्यास लसीकरण केंद्रावर देण्यात आलेल्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला मंडळ