अकोला : कोरोना या साथीच्या आजारात व्हेंटिलेटरची उपयुक्तता व कमतरता बघून आयआयटीचे इंजिनीयर वैभव भगत यांनी अत्यल्प दरात व्हेंटिलेटर उपलब्ध करून देऊन त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नवसंशोधकांना दिला जाणारा ग्राहम बेल पुरस्कार प्राप्त केला आहे.
वैभव भगत हे अकोला येथील जि.प. आगरकर कनिष्ठ महाविद्यालयातून नुकतेच प्राचार्यपदावरून सेवानिवृत्त झालेले वाल्मीकराव भगत व सौ. वर्षा भगत यांचे चिरंजीव आहेत. कोविडचा वाढता प्रसार, धोका व व्हेंटिलेटरचा तुटवडा व त्याची अत्यंत आवश्यकता बघून वैभव यांनी व्हेंटिलेटर बनविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी Noccare Robotics प्रा. लि. या स्टार्टअप कंपनीची स्थापना केली. याकामी त्यांना त्यांच्या आयआयटीच्या मित्रांची साथ मिळाली. रात्रंदिवस कठोर मेहनत व बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी अत्यंत उपयुक्त असे जलद गतीने काम करणारे व्हेंटिलेटर निर्माण केले. बाजारामध्ये चौदा ते पंधरा लाख किंमत असलेले व्हेंटिलेटर वैभव भगत यांच्या कंपनीने चार लक्ष ७० हजार रुपयात तयार करून मोठ्या वैद्यकीय संस्थांना उपलब्ध करून दिले आहे.
मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नीती आयोग, स्किल इंडिया ऑनलाइन मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर गव्हर्मेंट ऑफ इंडिया, महाराष्ट्र स्टेट सोसायटी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र, एफसीसीआय, कॅम्पस यांनी पुरस्कृत केलेल्या भारतातील नवसंशोधकांना ईजिस ग्राहम बेल अवॉर्ड दिला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार वैभव भगत यांनी प्राप्त करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.