अकोला: अकोल्याची कन्या सध्या औरंगाबाद येथील शासकीय कला व विज्ञान महाविद्यालयात संगीत विभागाच्या विभाग प्रमुख असलेल्या वैशाली देशमुख यांनी ग्वाल्हेर येथील तानसेन संगीत समारोहात हजेरी लावली.देशमुख या संगीतातील ग्वालियर घराण्याच्या सुविख्यात गायिका आहेत. त्यांना ग्वाल्हेर येथे तानसेन संगीत समारोहात राग बिहाग प्रस्तृत करून श्रोत्यांची मने जिंकून घेतली, तसेच त्यांनी जालंदर येथे भरलेल्या हरिवल्लभ संगीत संमेलनात गायन करू न रसिकांची दाद मिळविली आहे. देशमुख या भारतीय शास्त्रीय संगीतातील ग्वालियर व जयपूर घराण्याच्या गुरू-शिष्य परंपरेनुसार शिष्या आहेत. त्यांनी आपली आई सुगंधा शिवाणी देसाई यांच्या प्रेरणेने अकोला येथील कलाताई घाटे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे घेतले आहेत. त्यांनी बी.ए. व एम. ए. ही संगीतात प्रथम क्रमांकाने प्रावीण्यासह पदवी मिळविली असून, नागपूर विद्यापीठातून त्यांनी संगीत या विषयात डॉक्टरेट मिळविली आहे. त्यांनी ग्वालियर घराणाच्या डॉ. वीणा शहस्रबुद्धे आणि जयपूर घराण्याच्या गान सरस्वती किशोरी अयोनकर यांच्याकडून गुरू-शिष्य परंपरेनुसार तालीम घेतली आहे.देशमुख यांना संगीत विशारद, संगीत अलंकार, सुरमणी अवॉर्ड, राज्यस्तरीय जिजामाता पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. देशमुख या अकोल्यातील देसाई घराण्यातील कन्या असून, संजय देसाई यांच्या भगिनी आहेत. संगीताच्या रसिकासाठी अकोलेकरांनी अशा संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन व्हावे, अशी मनीषा व्यक्त केली आहे.