लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रेमाचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाइन डे’ होय. पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, आई-वडील यांचे नाते अधिक दृढ करणारा.. मनातल्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रेमाचा दिवस अविस्मरणीय बनविण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली आहे.पाश्चिमात्य संस्कृतीतील सण म्हणून ओळखला जाणारा ‘व्हॅलेंटाइन डे’ आता भारतीय संस्कृतीत अन्य सणांप्रमाणेच रुळला आहे. या दिवसाचीही जय्यत तयारी केली जाते. तरुणाईत फुलणारे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून या दिवसाचे औत्सुक्य अधिक आहे.इतकेच नव्हे, तर पती-पत्नी, भाऊ-बहीण या कौटुंबिक नात्यांचे रंग अधिक गहिरे करणारा दिवस म्हणूनही या ‘व्हॅलेंटाइन डे’ने घराघरांत आपले स्थान निर्माण केले आहे. गत आठवडाभरापासूनच या गुलाबी दिवसाची लगबग सर्व महाविद्यालये, प्रमुख बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. बाजारपेठांमधील दुकाने ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त विविध भेटवस्तू व शुभेच्छा कार्डांनी सजली आहेत.
भेटवस्तू खरेदीसाठी गर्दी..शहरातील भेटवस्तूंच्या दुकानातील अनेकविध प्रकारातील वस्तूंनी ग्राहकांचे मन आकषरून घेतले आहे. मराठीसह इंग्रजीत लिहिलेले प्रेमाचे शब्द असलेले आकर्षक संगीत वाजणारे ग्रीटिंग, वेगवेगळ्या आकारातले टेडी बेअर, परफ्युम्सचे कॉम्बी पॅक अशा अनेकविध वस्तू बाजारात आल्या आहेत. व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला मंगळवारी या वस्तूंची खरेदी व गुलाबाचे फूल खरेदी करण्यासाठी युवक-युवतींची गर्दी झाली होती.
शाकम्बरी प्रतिष्ठान, संत गाडगे महाराज ट्रस्ट, स्वच्छता अभियानाकडून आयोजन मूर्तिजापूर : विविध क्षेत्रात आपल्या अतुलनीय कर्तृत्वाची गुढी उभारणार्या १४ मान्यवरांचा १४ फेब्रुवारी (व्हॅलेंटाइन डे)च्या पर्वावर सन्मान करणारा स्नेहभाव आणि ममत्वाचा उत्सव सोहळा येथील शाकम्बरी प्रतिष्ठान, संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान आणि दादर (मुंबई)च्या संत गाडगे महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कारंजा रस्त्यावरील शाकम्बरी प्रतिष्ठान कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे यांच्या अध्यक्षतेखालील या सोहळ्यात उपविभागीय अधिकारी भागवत सैदाणे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन डॉ. श्रीकांत तिडके, बाप्पूसाहेब देशमुख, रामकृष्ण कोल्हाळे, ज्येष्ठ पत्रकार म. श. पाठक, ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. आर.जी. राठोड, आपत्कालीन पथकाचे दीपक सदाफळे, प्रा. अविनाश बेलाडकर, प्रख्यात गजलकार संदीप वाकोडे, अनिल डाहेलकर, दुग्ध व्यवसायातून रोजगार निर्मिती करणारे प्रशांत हजारी, शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करणारे उमेश सराळे, उद्योजक कैलाश अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते अ.रहमान आ. महमुद यांना सन्मानित करण्यात येईल, असे प्रसिद्धिप्रमुख अनवर खान यांनी कळविले आहे.
युवा सेनेच्यावतीने अनोखा निषेधव्हॅलेन्टाईन डे चा निषेध नोंदवीण्यासाठी युवासेनेच्यावतीनेअनोख्या जनहिताच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा वेळ वाया जावू नये, अभ्यासाची गोडी वाढावी म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे. आ.गोपीकिसन बाजोरिया, सहाय्यक संपर्क प्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितिन देशमुख शहर प्रमुखराजेश मिश्रा प्रा .अनुज, प्रा.नलकांडे सर .प्रा पागृत यांची उपस्थिती राहणार आहे. या पाश्चात्य संस्कृतीच्या प्रचार प्रसाराचा निषेध करावा असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील,शहर प्रमुख नितिन मिश्रा यांनी केले आहे.