अकोला : आजचे युग ऑनलाइन असून, प्रेमाची पहिली भेटही सोशल मीडियावरच होते. अन् त्यानंतरची चर्चा ही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच होते. मात्र, ऑनलाइन युगातही प्रेमाची पहिली साजरी-गोजरी भेट म्हणेज ‘टेडी’. पहिल्या भेटीत प्रेमवीरांची ‘टेडिबिअर’ला अधिक पसंती असते. व्हॅलेंटाइन वीकमध्ये चॉकलेट डे नंतर प्रेमाची गाडी वेगळ्या वळणावर नेण्यासाठी ‘टेडी’द्वारा भावना व्यक्त केल्या जातात. आज ‘टेडी डे’ असून, याच ‘टेडी’मध्ये शोधला जातो आपल्या जिवलगाचा गोड चेहरा.
‘व्हॅलेंटाइन वीक’च्या चौथ्या दिवशी साजिऱ्या प्रेमाची ही गोजरी भेट दिली जाते. सध्या बाजारात वेगवेगळ्या टेडी दाखल झाल्या आहे. शहराच्या बाजारपेठेत कोलकाता, दिल्ली येथून टेडी येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाला होता. सध्या या व्यवसायाला उभारी मिळण्याची आशा विक्रेत्यांनी व्यक्त केली. दिल्ली, कोलकाता येथून टेडी आणण्यासाठी भाडे अधिक मोजावे लागत असल्याने टेडीचे दरही वाढले आहे. टेडी खरेदी करताना ग्राहकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.
लाल, गुलाबी ‘टेडी’ला पसंती
‘टेडीबिअर’ विविध रंग, आकारांमध्ये येतात. व्हॅलेंटाइन वीकमध्ये लाल, गुलाबी टेडीची अधिक विक्री होत असल्याचे विकेत्याने सांगितले. तसेच यंदा व्यवसाय मंदावल्याचेही सांगितले. आपल्या आवडीच्या लोकांकडून गिफ्टमध्ये आलेले टेडीबिअर आपल्या बेडरूमध्ये सजवून ठेवतात. प्रत्येकाला डोळ्यासमोरच हवी असते प्रेमाची ही निरागस भेट.