अकाेला: सर्वसामान्य अकाेलेकरांना पाणी बचतीचा मूलमंत्र देणाऱ्या महापालिकेतील जलप्रदाय विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शनिवारी निकामी झालेल्या व्हाॅल्व्हमधून लाखाे लीटर पाण्याची नासाडी झाल्याचे चित्र रतनलाल प्लाॅट भागात पाहावयास मिळाले. पाण्याची नासाडी हाेत असताना या भागातील मनपाच्या व्हाॅल्व्हमनने व्हाॅल्व्ह बंद करण्याचीही तसदी न घेतल्याने महापालिकेचा व पर्यायाने सत्ताधारी भाजपचा भाेंगळ कारभार दिसून आला. यंदा महान धरणात मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याचे पाहून महापालिकेचा जलप्रदाय विभाग निर्धास्त झाल्याचे दिसत आहे. अकाेलेकरांना पाणी बचत करण्याची सवय लागावी तसेच प्रत्येक नळ कनेक्शन धारकाकडून पाणीपट्टी वसूल व्हावी या उद्देशातून मनपा प्रशासनाकडून अधिकृत नळ जाेडणी घेऊन नळाला मीटर लावण्याचे आवाहन केले जात आहे. असे असताना दुसरीकडे नादुरुस्त झालेल्या व्हाॅल्व्हमधून हजाराे नव्हे तर लाखाे लीटर पाण्याची नासाडी हाेत असताना जलप्रदाय विभाग व्हाॅल्व्ह बंद करण्याचीही तसदी घेत नसल्याचे समाेर आले आहे. शनिवारी रतनलाल प्लाॅट भागातील डाॅ. माया ठाकरे यांच्या खासगी क्लिनिकला लागून असलेला व्हाॅल्व्ह नादुरुस्त हाेता. या भागातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जात असतानाच या व्हाॅल्व्हमधून लाखाे लीटर पाण्याची नासाडी झाल्याचे समाेर आले. रस्त्यावर पाण्याचे लाेट पसरल्यामुळे नागरिकांमध्ये मनपा प्रशासनाप्रती राेष व्यक्त करण्यात आला.
नगरसेवकांना कर्तव्याचा विसर
रतनलाल प्लाॅट परिसरात भाजप नगरसेवकांचा बाेलबाला आहे. निकामी व्हाॅल्व्हमधून लाखाे लीटर पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी नगरसेवकांनी मनपाच्या व्हाॅल्व्हमनला सूचना केली असती तर हा व्हाॅल्व्ह बंद करणे शक्य हाेते. अर्थात नागरिकांचा पाणी पुरवठा खंडित हाेण्याच्या विचारातून पाण्याची नासाडी उघड्या डाेळ्यांनी पाहण्यात आली असली तरी या व्हाॅल्व्हमधून नागरिकांना दूषित पाणी पुरवठा झाल्याचे दिसून आले.