अकोला: लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या लक्षणीय मतांमुळे तब्बल १५ मतदारसंघांतील निकाल फिरले आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेस आघाडीकडून प्रयत्न सुरू असतानाच वंचितने मात्र राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. उमेदवादी निश्चितीसाठी पार्लमेंटरी कमिटी स्थापन करण्यात आली असून, शुक्रवारपासून विदर्भातील मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रमही हाती घेतला आहे.अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात औरंगाबाद वगळता त्यांना यश मिळाले नसले तरी राज्यातील १५ लोकसभा मतदारसंघांत ‘वंचित’ने घेतलेल्या मतांमुळे काँग्रेस आघाडीच्या विजयाचे गणित बिघडले. यामध्ये अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे व माणिकराव ठाकरे यांच्यासारख्या दिग्गजांना पराभवाचा झटका बसला. या पराभवापासून धडा घेत काँग्रेसने ‘वंचित’सोबत आघाडी करण्याकरिता पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात अजूनपावेतो अधिकृत बैठक किंवा जागांच्या प्रस्तावाबाबत चर्चा झालेली नसल्याने ही संभाव्य आघाडी केवळ माध्यमांमधील चर्चेतच आहे. या पृष्ठभूमीवर वंचितने २८८ जागांसाठी उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. विदर्भातील मतदारसंघाकरिता उमेदवारांच्या मुलाखतीची सुरुवात शुक्रवारपासून होत आहे. १३ जुलै रोजी नागपूर, १४ रोजी अमरावती तर १५ रोजी पश्चिम वºहाडातील उमेदवारांसाठी अकोल्यात मुलाखती होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचितने घेतलेल्या मतांमुळे या पक्षाकडे उमेदवारांची किती गर्दी होते, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष आहे. विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीसाठी पार्लमेंटरी कमिटी स्थापन करण्यात आली असून, अण्णाराव पाटील, अशोक सोनोने व रेखा ठाकूर यांचा या कमिटीमध्ये समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांवर वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान प्रबळ दावेदारांचा शोध घेतला जाईल. त्यानंतर सर्व उमेदवारांचा अहवाल अॅड. बाळासाहेबांना सादर केला जाईल.-अशोक सोनोने, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ.