- संतोष येलकरअकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांना पराभव पत्करावा लागला. २०१४ मधील निवडणुकीच्या तुलनेत ४० हजार ७२ मतांची वाढ झाली असली, तरी पराभव झाला आहे. त्यानुषंगाने मतदान केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी समोर आल्यानंतर, वंचित बहुजन आघाडी पराभवाचे चिंतन करणार असून, पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यात येणार आहे.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये ५ लाख ५४ हजार ४४४ मते प्राप्त करून २ लाख ७५ हजार ५९६ मतांची आघाडी घेत भाजपाचे अॅड. संजय धोत्रे यांनी विजय प्राप्त केला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ७८ हजार ८४८ मते मिळाली. २०१४ मधील अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अॅड. आंबेडकर यांनी २ लाख ३८ हजार ७७६ मते प्राप्त करून ते तिसऱ्या क्रमांकावर होते. २०१९ च्या निवडणुकीत अॅड. आंबेडकर यांनी २ लाख ७८ हजार ८४८ मते प्राप्त करून, दुसºया क्रमांकावर राहिले. २०१४ मधील निवडणुकीत अॅड. आंबेडकर यांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत यावेळी ४० हजार ७२ मतांची वाढ झाली असली तरी, पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानुषंगाने मतदान केंद्रनिहाय झालेल्या मतदानाच्या आकडेवारीची माहिती प्राप्त झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पराभवाच्या कारणांची मीमांसा करण्यात येणार आहे. त्यामध्ये मते कमी मिळण्याच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर चिंतन करण्यात येणार आहे.‘अकोला पश्चिम’मध्ये मिळाली कमी मते!अकोला लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत अॅड. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ७८ हजार ८४८ मते मिळाली. त्यामध्ये सर्वात कमी मते अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मिळाली. या मतदारसंघात अॅड. आंबेडकर यांना केवळ २३ हजार ७४१ मते मिळाली.
निवडणुकीपूर्वी अशी केली होती तयारी!लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये बुथ कमिटी बांधणी, बुथ कमिटीमधील सदस्यांना प्रशिक्षण, गाव तेथे शाखा, महिला आघाडी, युवक आघाडी शाखा स्थापन करण्यात आल्या होत्या. मतदार नोंदणीसाठी पक्षाच्यावतीने प्रयत्न करण्यात आले होते, तसेच गावा-गावांत दौरे करून मतदारांशी संवाद साधण्याचा कार्यक्रमही राबविण्यात आला होता. निवडणुकीपूर्वी सुरू केलेली तयारी आणि केलेल्या प्रयत्नांच्या आधारे लोकसभा निवडणुकीत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विजयाची अपेक्षा करण्यात येत होती; मात्र त्या तुलनेत मते मिळाली नसल्याचे वास्तव आहे.