अकोला - हातरून जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. पोटनिवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढले होते, तर काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा स्वतंत्र निवडणूक लढले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेससोबत लढूनही शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला आहे. दरम्यान, हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
जिल्हा परिषद हातरून गटाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवार ५ जून रोजी मतदान घेण्यात आले. पाच उमेदवारांनी निवडणूक लढवली असली तरी शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, भाजप व काँग्रेस या चार राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत झाली. यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या लीना सुभाष शेगोकार १७०० मतांनी विजयी झाल्या. त्यांना ४३०१ मते मिळाली.
वंचित बहुजनच्या लीना शेगोकार यांनी शिवसेनेच्या अश्विनी अजाबराव गवई यांचा पराभव केला. गवई यांना २६६० मते मिळाली. भाजपाच्या राधिका पाटेकर यांना २०७१, तर काँग्रेसच्या रसिका इंगळे यांना केवळ ३६२ मते मिळाली. गेल्यावेळी शिवसेनेच्या सुनिता गोरे यांनी या सर्कलमधून विजय मिळविला होता. त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक झाली आणि यामध्ये वंचितने सेनेकडून जागा खेचून घेतली.