लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील २८८ जागा लढविण्याची वंचित बहुजन आघाडीची तयारी असून, २८८ जागांपैकी किमान ५० टक्के जागांवर वंचित बहुजन आघाडी ‘ओबीसीं’ना संधी देणार आहे, असे संकेत वंचित बहुजन आघाडीच्या देखरेख समितीचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन सलगर यांनी शुक्रवारी येथे दिले.अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘ओबीसीं’ना सर्वात जास्त आरक्षण देण्याचा वंचित बहुजन आघाडीचा ‘अजेंडा’ असल्याचे सांगत विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व २८८ जागांपैकी किमान ५० टक्के जागा वंचित बहुजन आघाडीकडून ‘ओबीसीं’ना मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणींमार्फत राज्यात स्वतंत्ररीत्या पक्षाचे काम करण्यात येत असून, भारिप-बमसं आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये समन्वय राखण्यासाठी देखरेख समिती गठित करण्यात आली आहे, असेही अर्जुन सलगर यांनी स्पष्ट केले.भाजपा-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील ‘ओबीसीं’चा केवळ मतांसाठी वापर केला, अशी टीका अर्जुन सलगर यांनी यावेळी केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रदेश संघटक अरुंधती शिरसाट, दिनकर वाघ, गजानन गवई, ज्ञानेश्वर सुलताने, अशोक शिरसाट, सम्राट सुरवाडे, प्रभा शिरसाट, आकाश शिरसाट, शेख साबीर, डॉ. प्रसन्नजित गवई, सचिन शिराळे, विकास सदांशिव व बळीराम चिकटे उपस्थित होते.राज्यातील ‘ओबीसीं’चे आरक्षण धोक्यात!राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ‘ओबीसीं’चे आरक्षण फडणवीस सरकारने कमी केले असून, यासंदर्भात नुकताच शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला आहे. त्यानुसार ओबीसींच्या १०५ जागा कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील ‘ओबीसीं’चे आरक्षण धोक्यात असल्याचा आरोप अर्जुन सलगर यांनी केला. राज्यात भाजपा सरकार बहुमताने सत्तेवर आल्यास ‘ओबीसीं’चे आरक्षण संपविण्याची चाचणी राज्यात घेतली जाणार आहे. आरक्षणाची समीक्षा झाली पाहिजे, असे सूतोवाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख मोहन भागवत यांनी केले असून, संपूर्ण आरक्षण रद्द करण्याची भाजपाची तयारी आहे, असा आरोपही सलगर यांनी केला.
‘वंचित’ ५० टक्के जागांवर ‘ओबीसीं’ना देणार संधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 12:33 PM