अकोला: जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त दहा जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत एका जागेवर भाजपच्या एक जिल्हा परिषद सदस्याची अविरोध निवड झाल्याने, उर्वरित नऊ जागांसाठी सोमवारी मतदान घेण्यात आले. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, दुपारी १२ वाजेपर्यंत निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने पाच जागांवर विजय मिळवीत बाजी मारली. तर महाविकास आघाडीने तीन जागांवर आणि भाजपने एका जागेवर विजय मिळविला.
जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त दहा सदस्य पदांवर जिल्हा परिषदेच्या सदस्यांमधून निवड करण्यासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये एका जागेवर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य रायसिंग राठोड यांची अविरोध निवड झाल्याने, 'डीपीसी'च्या उर्वरित नऊ जागांसाठी सोमवार, २९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात मतदान घेण्यात आले. त्यामध्ये निवडणूक लढविणाऱ्या १६ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये सीलबंद झाले होते. मंगळवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मतमोजणी सुरू करण्यात आली व दुपारी १२ वाजेपर्यंत निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने सर्वाधिक पाच जागांवर विजय मिळवीत बाजी मारली. तर महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांना प्रत्येकी एक जागेवर विजय प्राप्त झाल्याने महाविकास आघाडीला तीन जागांवरच विजय मिळाला.एका जागेवर भाजप उमेदवाराने विजय प्राप्त केला.
पाच सदस्य असलेल्या भाजपला मिळाल्या दोन जागा!
एकूण ५३ सदस्यसंख्या असलेल्या अकोला जिल्हा परिषदेत भाजपचे सदस्यसंख्याबळ केवळ पाच असले तरी, डीपीसी निवडणूक या पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये एका सदस्याची अविरोध निवड करण्यात आली असून,दुसरा सदस्य निवडून आणण्यातही भाजपने यश मिळविले आहे.