अकोला -सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर येथील म्हाडा कॉलनीत नव्याने तयार झालेल्या व रहिवासी न आलेल्या गाळ्यांमध्ये असामाजिक तत्वांद्वारे तोडफोड करण्यात येत असल्याचे बुधवारी समोर आले आहे. त्याच बरोबर येथील नागरीकांना धमकावण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी संक्रांतीच्या रात्री चोरट्यांनी रहिवाशी नसलेल्या अर्पाटमेंट मधील पाण्याच्या टाक्या चोरण्याच्या उद्देशाने तोडफोड केल्याचे चित्र आहे. या ठिकाणी रात्री मोठ्या प्रमाणात अवैध धंदे होत असल्याची तक्रार नुकतीच स्थानिकांनी सिव्हिल लाईन्स पोलिसांना दिली आहे.राम नगर म्हाडा कॉलनी येथे रहिवाश्यांनी बसविलेल्या पाण्याच्या टाक्या चोरण्याचा उद्देश चोरट्यांचा असावा. त्यामुळे त्यांनी टेरेसवरच्या भागातील लावलेले कुलुप तोडण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान, या ठिकाणी विद्युत प्रवाह सुरु झाला असताना तेथील वीजेचे तारा व फिटिंग काढण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी असामाजिक तत्वाद्वारे स्थानिक रहिवाशांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. राम नगरातील नव्याने बांधलेल्या म्हाडा सदनिकांमध्ये रात्री अवैध गोष्टींना उत आला असून यामुळे स्थानिक नागरीकांची मोठी अडचण होत आहे. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी या ठिकाणी गस्त घालून सर्व गोष्टींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
म्हाडा कॉलनीतील घरांमध्ये तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 4:05 PM