अकोला : विदर्भ क्रिकेट संघटनेद्वारा आयोजित तथा जिल्हा हौशी क्रिकेट संघटना अकोला, अकोला क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून दि.२ मेपासून सुरुवात होणार आहे.
विदर्भातील प्रतिष्ठेची मानल्या जाणारी स्पर्धेचे सामने अकोला क्रिकेट क्लब व दिवेकर क्रिडांगण, उमरी येथे होणार आहेत. आयपीएल स्पर्धेप्रमाणेच प्रत्येक जिल्हा संघात विदर्भातील आयकॉन खेळाडूंचा समावेश राहणार आहे. उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंची बीसीसीआच्या मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेकरीत विदर्भ संघात वर्ण लागण्याची शक्यता आहे. विदर्भ क्रिकेट संघटनेमार्फत ज्येष्ठ निवड समितीही या स्पर्धेकरीता उपस्थित राहणार आहे, अशी माहिती विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी दिली आहे.
दोन झोनमध्ये पार पडणार स्पर्धा
व्ही.सी.ए. टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा ही दोन झोनमध्ये पार पडणार आहे. एक झोन अकोला, तर दुसरा राजस्थान रॉयल क्रिकेट अकादमी, तळेगाव येथे होणार आहे. अकोला झोनमध्ये अकोला, यवतमाळ, गोंदीया, भंडारा, नागपूर, वाशिम जिल्ह्यांचा समावेश आहे. स्पर्धा दि.२ ते ७ मेपर्यंत होणार असून, उपांत्य तथा अंतिम सामना तळेगाव येथे दि.९ व १० मे रोजी संपन्न होणार आहे.