लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यावर्षी शेतशिवारांमध्ये बºयापैकी पाणी शिल्लक असल्याने बहुतांश शेतकºयांनी भाजीपाला लागवडीला प्राधान्य दिले. सद्या हा भाजीपाला विक्रीसाठी बाजारपेठेत आणला जात आहे. मात्र, सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याचे दर गडगडल्याने लागवड खर्चही वसूल होणे कठीण झाल्याने शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. साधारणत: दीड ते दोन महिन्यांपूर्वी भाजीपाल्याचे दर अक्षरश: गगणाला भिडले होते. सद्या मात्र विहिर, कुपनलिका, सिंचन प्रकल्पांचे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने बहुतांश शेतकºयांनी भाजीपाला लागवडीकडे लक्ष केंद्रीत केले. पोषक हवामान लाभल्याने उत्पन्नही मोठ्या प्रमाणात झाले; परंतु दर कोसळल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी पुरते वैतागले आहेत. वाशिममधील रविवारच्या आठवडी बाजारात मेथी, शेपू, पालक, सांभार, करडई या पालेभाज्यांसह टमाटर, फुलकोबी, पानकोबी या भाज्यांनाही अत्यल्प दर मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, भाजीपाला हा नाशवंत असल्यामुळे तो तात्काळ विकण्याशिवाय पर्याय नसल्याने शेतकºयांसोबतच भाजीविक्रेतेही अधिक अडचणीत सापडले आहेत; तर दर कोसळल्याने सर्वसामान्य ग्राहकांची मात्र सोय झाल्याचे बोलले जात आहे.
वाशिममध्ये भाजीपाल्याचे दर गडगडले; शेतकरी हवालदिल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 6:14 PM