अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने अनलॉक प्रक्रिया सुरू केली. अनलॉकनंतर बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये वांगे अनलॉकपूर्वी २० ते ३० रुपये किलोने विक्री होत होते, ते आता तब्बल ५० ते ६० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहेत. भाजीपाल्याचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
अनलॉक प्रक्रियेनंतर बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. त्याचबरोबर महागाईही वाढल्याचे दिसून येत आहे. फळबाजारात फळांचे दर गगनाला भिडले असून, जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. येणारा पावसाळा व खरीप हंगामाची लागणारी लगबग पाहता बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पालक ४० रुपये प्रतिकिलो विक्री होत असल्याचे चित्र आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे.
-----------------------
भाजीपाल्याचे दर वाढल्याने दैनंदिन खर्च वाढला आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे. भाजीपाल्याची खरेदी कमी झाली असून, दाळ-वरणाला पसंती देत आहोत. सरकारने लक्ष देऊन वाढलेली महागाई कमी करावी.
- मंगला परळीकर, गृहिणी.
----------------
भाजीपाल्याचे दर अचानक वाढल्याने घरखर्च कसा भागवावा, असा प्रश्न पडला आहे. भाजीपाल्याचे भाव गगनाला टेकले असून, डाळीवर जोर देत आहे. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहे. महागाईने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत.
-पुष्पा वानखडे, गृहिणी
-----------------------------------
पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक सध्या पेरणीच्या कामामध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आवक घटल्याने भाव वाढले आहेत.
-प्रदीप निखाडे, व्यापारी
-----------------------------------
ग्रामीण भागात शेतकरी व्यस्त आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर वाढले असून, काही भाजीपाला स्वस्तही झाला आहे.
-गजानन सोनकर, व्यापारी
-------------------------------------------
शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा
लॉकडाऊनमध्ये भाजीपाला स्वस्त होता. अनलॉक प्रक्रियेनंतर ठोक भाजीपाला वाढणार अशी शक्यता होती. मात्र, काही प्रमाणातच भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. यामुळे भाडेखर्चही वसूल होत नाही. केवळ वांग्याचे दर वाढल्याने उत्पन्न प्राप्त होत आहे. मात्र, वांग्याचे क्षेत्र कमी आहे. यामध्ये केवळ व्यापाऱ्यांचा फायदा होत असून, शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
- अजय दामोदर, शेतकरी