अकोला : जिल्ह्यात संचारबंदी असल्याने भाजीपाला उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाला आहे. अनेक भाज्या किरकोळ बाजारात कमीत कमी विकल्या जात आहेत. गेल्या पंधरा दिवसात भाजीपाल्याच्या दरात प्रति किलोवर २० रुपयांनी वाढ झालेली आहे.
--------------------------------------
आंब्याची विक्री घटली
अकोला : उन्हाळा सुरू होताच जिल्ह्यात आंब्याची मागणी वाढली होती; मात्र कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढल्याने संचारबंदी करण्यात आली. याचा परिणाम आंबा विक्रीवर झाला. जिल्ह्यात आंब्याची विक्री घटली असून मागणी कमी झाल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
-------------------------------------------
मजुरांपुढे संकट
अकोला : गेल्यावर्षी २२ मार्चपासून कोरोनाने प्रचंड थैमान घातले. शासनाच्यावतीने कोरोना रोखण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात विविध प्रकारे प्रतिबंध घातले जात आहेत. त्यामुळे गावागावांत संचारबंदी लागत आहे. गावातील सर्वसामान्य कुटुंबातील मजुरी करणाऱ्या मजुरांच्या हाताला नियमितपणे काम मिळत नसल्यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
------------------------------------------
कृषीसेवक, रोहयो कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्या!
अकोला : शासनाने अद्यापही कृषी अधिकारी, कर्मचारी तसेच काही शासकीय कर्मचाऱ्यांसह रोजगारसेवकांना कोरोना संकटात विमा सुरक्षेचे कवच दिलेले नाही. त्यामुळे रोहयोची कामे करताना जिल्ह्यात कोणाचा मृत्यू झाल्यास शासन त्याची जबाबदारी घेणार काय? असा प्रश्नही ग्रामसेवक, कृषी सहायक, पंचायत समिती रोहयो विभागातील कार्यरत अधिकारी, कर्मचारी, वनरक्षक, रोजगार सेवक करू लागले आहेत.
-----------------------------------------
दुसऱ्या लाटेत मदत ओसरली
अकोला : मागील वर्षी कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर लोकांना खायला काही नाही, म्हणून केंद्र शासनापासून तर गावातील ग्रामपंचायतीने देखील मदत केली. यावर्षी मात्र लॉकडाऊनमुळे गरिबांचे हाल होत असले तरी गतवर्षीसारखी मदत होत नसल्याचे चित्र आहे.