विशेष पथकाची कारवाई
अकोला : अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व उगवा परिसरातून मोरणा नदीपात्रातून रेतीचे अवैधरीत्या चोरी करणारे एक वाहन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा पकडले. या वाहनचालकाविरुद्ध अकोट फाईल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उगवा येथील रहिवासी संदीप इंगळे हा महिंद्रा जितो वाहनामधून नदीपात्रातून रेतीची चोरी करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून हे वाहन ताब्यात घेतले. या वाहनातील रेतीची रॉयल्टी मागितली असता ती नसल्याचे समोर आले. त्यामुळे वाहनचालकाविरुद्ध अकोट फाईल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार हजार रुपयांची रेती आणि चार लाख रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.