अकोला: शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अपघातग्रस्त वाहने, कारवायातील जप्त वाहने पडून आहेत. या वाहनांचा न्यायालयाच्या आदेशानंतर लिलाव करण्यात येणार असून, पोलीस स्टेशननिहाय यादी बनविण्याकरिता संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने यादी बनविण्याचा आदेश शहर पोलीस उपअधीक्षकांनी दिला आहे.अपघात घडल्यानंतर अपघातग्रस्त वाहने, तसेच पोलिसांकडून करण्यात आलेल्या विविध कारवायात जप्त करण्यात आलेली वाहने तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने पोलीस स्टेशनच्या आवारात पडून आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही वाहने या ठिकाणी धूळ खात असून, या वाहनांना नेण्याकरिता कोणीच पुढाकार घेत नाही. तसेच वाहनांची कागदपत्रे, इन्शुरन्स यामुळे संबंधित कंपनी, विके्रते, वाहनधारक वाहन नेण्यासाठी पोलीस स्टेशनची पायरी चढत नसल्याचे दिसून येते. यासोबत पोलीस स्टेशन आवारात संबंधित जागा अडगळीची होऊन बसल्याने अनेक समस्यांचा सामनासुद्धा करावा लागत असल्याचे वास्तव आहे. यासंदर्भात पोलीस मित्र आशीष मधुकर सावळे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनी शहर विभागातील पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना वाहनाची यादी तयार करण्याचा आदेश दिला आहे. या यादीनुसार न्यायालयातून आदेश प्राप्त करून वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकारी, कर्मचाºयांसह परिसरही मोकळा श्वास घेणार आहे. आशीष सावळे यांनी दिली दिशाविविध पोलीस स्टेशनमध्ये जमा असलेल्या वाहनांचा लिलाव करून आलेली रक्कम पोलीस फंडात जमा करावी. ही रक्कम पोलीस स्टेशनच्या इतर कामाकरिता वापरण्यात यावी यासंदर्भात आपले सरकारवर आशीष मधुकर सावळे यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल पोलीस स्टेशननिहाय यादी बनविण्याचा आदेश देण्यात आला आहे.