अकोला : जिल्हा परिषदेच्या योजनांचा एका लाभार्थीस दुसऱ्यांदा लाभ मिळत असल्यास त्याची पडताळणी करण्यासोबतच थेट खात्यात अनुदान जमा करणे, बँक खात्याची तपासणी करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने सुरू केला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही पडताळणी पूर्ण करून लाभाची रक्कम जमा करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसाठी लाभार्थी निवड महिनाभरापूर्वी करण्यात आली आहे. त्यानंतर लाभार्थींची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले; मात्र अद्यापही तपासणी पूर्ण झाली नाही. गरजू लाभार्थींना तातडीने लाभ मिळावा, यासाठी प्रत्येक लाभार्थीच्या खात्यात एक रुपया जमा करून बँक खात्याची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेकडून केला जात आहे. वस्तू खरेदी केलेल्या लाभार्थींची तपासणी पूर्ण झाली असल्यास त्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा केली जात आहे. तपासणी न झालेल्या लाभार्थींची यादीनुसार त्यांच्या बँक खात्यात लाभार्थींची पात्रता तपासणी करण्यासाठी एक रुपया जमा करणे, त्याचवेळी बँकेचे खाते चालू आहे की नाही, याचीही खात्री केली जाणार आहे. सोबतच एखाद्या लाभार्थीला दोन लाभ दिले असल्यास त्याचीही माहिती याद्वारे मिळणार आहे. लाभार्थींच्या खात्याची तपासणी करून रक्कम जमा करण्याची कार्यवाही ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचेही आदेशात बजावण्यात आले आहे.