अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात मजूर कुटुंबांच्या जॉबकार्डच्या पडताळणीचे काम गाव पातळीवर करण्यात येत आहे. या पडताळणीद्वारे रोहयो अंतर्गत जॉबकार्डधारक मजुरांची माहिती अद्ययावत करण्यात येत आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजूर कुटुंबांना गत पाच वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या जॉबकार्डची पडताळणी रोहयो विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यामध्ये जॉबकार्डधारक कुटुंबांतील मयत सदस्याचे नाव जॉबकार्डातून कमी करणे, लग्न झालेल्या मुलीचे नाव कमी करणे, नेहमीसाठी स्थानांतर केलेल्या मजूर कुटुंबातील नावे जॉबकार्डातून वगळणे यांसह जॉबकार्ड देण्यात आलेल्या मजूर कुटुंबांपैकी किती मजूर कुटुंब सद्यस्थितीत रोहयो अंतर्गत कामावर आहेत, यासंदर्भात माहिती घेण्यात येत आहे. अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, अमरावती, वाशिम व यवतमाळ इत्यादी पाचही जिल्ह्यात रोहयो अंतर्गत मजूर कुटुंबांच्या जॉबकार्डची पडताळणी करण्यात येत असून, त्यामध्ये मजूर कुटुंबांची अद्ययावत माहिती घेण्यात येत आहे.ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवकांकडून पडताळणी!रोहयो अंतर्गत मजूर कुटुंबांच्या जॉबकार्डच्या पडताळणीचे काम गाव पातळीवर संबंधित ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवकांमार्फत करण्यात येत आहे. पडताळणीत घेण्यात येत असलेल्या अद्ययावत माहितीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेकडे सादर करण्यात येत आहे.अकोला जिल्ह्यात १.४३ लाख मजूर कुटुंबांच्या जॉबकार्डची पडताळणी!रोहयो अंतर्गत गत पाच वर्षापूर्वी अकोला जिल्ह्यात १ लाख ९५ हजार मजूर कुटुंबांना जॉबकार्ड वितरीत करण्यात आले. त्यापैकी जून अखेरपर्यंत १ लाख ४३ हजार मजूर कुटुंबांच्या जॉबकार्डची पडताळणी करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. एकूण जॉबकार्डधारक मजूर कुटुंबांपैकी ६९ हजार ४३१ मजूर कुटुंबांनी गत तीन वर्षात रोहयो अंतर्गत काम केले असून, त्यापैकी ४९ हजार ५७१ मजूर कुटुंबांच्या जॉबकार्डची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे.