अकोला : जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यासाठी प्राप्त प्रस्तावांची पडताळणी करण्याचे काम अखेर पूर्ण करण्यात आले असून, त्यामध्ये पात्र ठरलेल्या शिक्षकांच्या प्रस्तावांची ''फाइल'' दोन दिवसांत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांपैकी सेवेची १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यात येते. त्यानुषंगाने चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी शिक्षकांचे प्रस्ताव जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून गतवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांची पडताळणी करण्याचे रेंगाळलेले काम अखेर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत पूर्ण करण्यात आले असून, त्यामध्ये चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रस्तावाची फाइल दोन दिवसांत प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.
३५० शिक्षकांचे परिपूर्ण
प्रस्ताव पात्र; १७० प्रस्तावांत त्रुटी !
चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी जिल्ह्यातील प्राप्त ५२० शिक्षकांच्या प्रस्तावांची पडताळणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये ३५० शिक्षकांचे परिपूर्ण प्रस्ताव पात्र ठरविण्यात आले असून, उर्वरित १७० प्रस्तावांत त्रुटी असल्याने संबंधित प्रस्ताव त्रुटी पूर्ततेसाठी प्रलंबित ठेवण्यात आले.