अकाेला : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी डॉ. विठ्ठलराव जी. ढवळे (वय ९४) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. दुपारी सिंधी कैंप मुक्तिधाममध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसीलदार पाटील, पाेलिस उपविभागीय अधिकारी यांच्यासह अकाेला शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित हाेते. ढवळे यांनी वयाच्या दहाव्या वर्षांपासून स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला हाेता. ब्रिजलालजी बियाणी, अप्पासाहेब खेडकर, प्रमिलाताई ओक यांची भाषणांनी प्रेरित हाेत त्यांनी देशकार्य केले. स्वातंत्र्यासाठी लढले व स्वातंत्र्यांच्या अमृतमहाेत्सवाचेही साक्षीदार हाेण्याचे भाग्य त्यांना लाभले.
भावसार क्षत्रिय समाज संघटनेच्या माध्यमातूनही त्यांनी सामाजिक कामात नेहमीच पुढाकार घेतला. गेल्या काही वर्षांपासून ते अंथरूणाला खिळले हाेते. मात्र, वयाच्या ९४ वर्षांतही त्यांची स्मृती व आवाज ठणठणीत हाेता. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव मुकुंद आणि राजेंद्र ढवळे यांच्यासह माेठा आप्त परिवार आहे.