अकोला : पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना पशुवैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेता यावे, याकरिता पाच वर्षांपूर्वी अकोल्याला शासकीय पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय तसेच पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला; पण अद्याप महाविद्यालय सुरू झाले नसल्याने विद्यार्थी पदवी अभ्यासक्रम प्रवेशापासून वंचित आहे. महाविद्यालय सुरू न झाल्यास शासनाकडून मिळालेला हा निधी परत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पश्चिम विदर्भात शासकीय पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयच नसल्याने येथील विद्यार्थ्यांना या शिक्षणासाठी नागपूर, मराठवाडा, पश्चिम मराठवाडा किंवा मुंबईला जावे लागायचे, हे शिक्षण घेण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे अनेक जण इतक्या दूर जात नव्हते. याच अनुषंगाने शासनाने पश्चिम विदर्भात अकोला येथे पदवी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात परवानगी देऊन पाच कोटी रुपये निधी मंजूर केला; पण गत पाच वर्षांपासून केवळ जागेअभावी हे महाविद्यालय सुरू होऊ शक ले नाही. मागच्या वर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची वाशिम रोडवरील जागा संशोधनासाठी उपयुक्त असून, महाविद्यालय बांधण्यासाठी निश्चित करण्यात आली होती. आता पुन्हा यात फेरबदल करण्यात आला असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बाभूळगाव येथील जागेवर महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव माफसू विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत पारित करण्यात आला आहे; परंतु अद्याप महाविद्यालय सुरू झाले नाही.
स्नातकोत्तर पशु व मत्स्य विज्ञान संस्थेची जागा उपलब्धपदवी अभ्यासक्रम पाच वर्षांचा असल्याने ३०० विद्यार्थी येथे असतील. उर्वरित स्नातकोत्तर अभ्यासक्रमाचे १२० विद्यार्थी म्हणजेच जवळपास ५०० विद्यार्थी येथे शिक्षण घेणार आहेत. त्यासाठीची जागा स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्थेकडे आहे. येथे हे महाविद्यालय सुरू केले असते तर आतापर्यंत विद्यार्थ्यांची बॅच पदवी घेऊन बाहेर पडली असती; पण याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या भागातील शेतकºयांना वाटते.
- महाविद्यालय जागेसाठी शासनाचे परिपत्रक निघाल्यावर ते पशुवैद्यक परिषदेकडे जाईल, तेव्हा पदवी महाविद्यालय सुरू होईल.डॉ. हेमंत बिडवे,सहयोगी अधिष्ठाता,स्नातकोत्तर पशु व मत्स्य विज्ञान संस्था, अकोला.