अकोला: जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांनी निधी खर्चाची माहिती न देण्याचा ताणलेला मुद्दा आणि अधिकारी, पदाधिकाऱ्यांना जुमानतच नसल्याने इरेला पेटलेले अर्थ सभापती पुंडलिकराव अरबट यांच्या प्रतिष्ठेच्या वादात बांधकाम विभागाकडे जिल्ह्यातील विकासकामांसाठी असलेला १५ कोटीपेक्षाही अधिक निधी परत जाणार आहे. गेल्या वर्षी परत गेलेले ६ कोटी शासनाने परत न देता त्यामध्ये ३ कोटींची भर घालत ९ कोटींचा निधी दिला, हे विशेष.मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांनी अर्थ समिती सभापती पुंडलिकराव अरबट यांना हवी असलेली माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच तक्रार करण्याचे आव्हानही दिले. महिला अधिकाऱ्याची ही वागणूक अरबट यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळे ३१ मार्च रोजी रोकड, धनादेश नोंदवही, आवक-जावक वहीची मागणी केली. कर्मचाऱ्यांनी ती न देता नागर यांच्याकडेच असल्याचे सांगितले. त्यातून प्रकरण आणखी ताणले गेले. परिणामी अरबट यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांनी पत्र देत नागर यांना ३१ मार्च नंतरची देयक अदा न करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे २०१६-१७ या आर्थिक वर्षातील कोट्यवधींचा निधी खर्चच थांबला.