अकाेला जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून, या निकालामध्ये मतदारांनी तरुणांना तसेच नवागतांना संधी देत त्यांच्या हाती गावगाडा साेपविला आहे. संपूर्ण निवडणुकीच्या काळात ही निवडणूक पक्षीय नाही, असा दावा करणारे सर्वच राजकीय पक्ष आता आमच्या पक्षाचाच विजय झाला, असे दावे-प्रतिदावे करत असून, विजयी उमेदवारांची माेट बांधून सत्ता हस्तगत करण्याच्या तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सत्ता परिवर्तनाचा बिगुल वाजला आहे. प्रस्थापितांच्या पॅनेलला नकार देत मतदारांनी नव्या दमाच्या तरुणांच्या हाती सत्ता साेपविली आहे. अकाेट तालुक्यातील कुटासा ग्रामपंचायतीमध्ये आमदार अमाेला मिटकरी यांच्या नेतृत्वातील पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे, तर काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या माेहळा गावात त्यांच्या गटाचे वर्चस्व कायम ठेवण्यात त्यांना यश आले आहे. तालुक्यातील अर्ध्याअधिक ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तन घडले आहे. बाळापूर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींपैकी वाडेगाव, पारस, गायगाव, हातरूण, निमकर्दा, उरळ या माेठया गावांमध्ये परिर्वतनाची लाट आहे. रिधाेरामध्ये सत्ता जैसे थे ठेवण्यात आली आहे. मूर्तीजापूर तालुक्यातील २७ गावांपैकी अनेक गावांमध्ये मतदारांनी बदल घडविला आहे. कुरूम, सिरसाे, हातगाव या माेठ्या गावांमध्ये दीड दशकांपासून सत्तेचे परिवर्तन घडले आहे. बार्शी-टाकळी तालुक्यातही पिंजर राजंदा महान या गावात प्रस्थापितांना मतदारांनी नाकारले आहे. तेल्हाऱ्यात वंचितला ३२ पैकी १४ ग्रामंपचातींवर यश मिळाले असले, तरी जि. प. अध्यक्षांच्या गावातच वंचित पराभूत झाला आहे. अकाेला तालुक्यातही परिवर्तनाचे वारे आह, तर पातुर तालुक्यात सेनेला १६ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविता आला आहे.
३३५ सदस्यांच्या अविरोध निवडीवर शिक्कामोर्तब
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत १० ग्रामपंचायती अविरोध झाल्या. या १० ग्रामपंचायतींच्या ७४ उमेदवारांसह जिल्ह्यातील एकूण ३३५ उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून अविरोध निवड निश्चित करण्यात आली. संबंधित ३३५ उमेदवारांची अविरोध निवड झाल्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. त्यावर आजच्या निकालाअंती शिक्कामोर्तब झाले आहे.