अकोला: पुलवामा येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी कॅटने आवाहन करून चीन उत्पादित वस्तूंची होळी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी श्रावगी टावर्समध्ये चीन उत्पादित वस्तूंची होळी केली. सायंकाळी ५ वाजता झालेल्या या निषेधार्थ होळीत चीनविरुद्ध नारेबाजी करण्यात आली.पुलवामा हल्ल्यानंतर चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे. पाकिस्तान आणि चीनला धडा शिकविण्यासाठी भारतीयांनी चीन उत्पादित वस्तूंवर बहिष्कार टाकावा, अशी भूमिका कॅटने घेतली. राष्ट्रीय ‘कॅट’चे अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि सचिव अशोक डालमिया यांच्या पुढाकारात अकोल्यातील विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या कार्यालयात व्यापाऱ्यांची बैठकदेखील झाली. त्यात १९ मार्च रोजी चीन उत्पादित वस्तूंची होळी करण्याचे आवाहन केले गेले. या आवाहनास साद देत अकोल्यातील विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी चीन उत्पादित वस्तूंची होळी केली. होळी दहन करताना दहशतवाद्यांना सहकार्य करणाºयांचा नारेबाजीतून निषेध करण्यात आला. याप्रसंगी विदर्भ चेंबरचे अध्यक्ष राजकुमार बिलाला, उपाध्यक्ष निकेश गुप्ता, कोषाध्यक्ष किशोर बाछुका, दिलीप खत्री, वसंत बाछुका, विजय पनपालिया, अशोक गुप्ता, अॅड. सुभाष ठाकूर, मनीष हिवराळे आदी व्यापारी-उद्योजक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.या वस्तूंची झाली होळीचीनच्या वस्तूंच्या होळीत मंगळवारी लहान मुलांची खेळणी, कॉम्पुटर की-बोर्ड, मोबाइल, खेळण्यातील ड्रोन, वाटरबॅग, वॉच आदी वस्तूंची होळी करण्यात आली. प्रतीकात्मक स्वरूपाच्या होळीतून व्यापारी-उद्योजकांनी वस्तूंवर बहिष्कार घालावा हा यामागचा उद्देश असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.